BEST बसस्थानकाच्या जागेवरील अतिक्रमणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा BMC आयुक्तांना दणका; 5 लाखांचा दंड, वेतन रोखण्याचे आदेश
अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाचे पालन नाही
मुंबईतील BEST बसस्थानकासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवर अतिक्रमण असल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला होता. सर्वोच्च न्यायालयाने 13 ऑगस्ट 2025 रोजी संबंधित विकासकाला सुमारे 3,400 चौरस मीटर जागा आणि प्रशासकीय इमारतीचा ताबा महापालिकेकडे देण्याचे निर्देश दिले होते. ही जागा ताब्यात घेऊन बसस्थानक कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती.
याशिवाय, संबंधित जागेवरील अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रियेनुसार हटवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. मात्र, अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेत अपेक्षित प्रगती न झाल्याने न्यायालयाने यापूर्वीही महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.
मुदतवाढीची मागणी फेटाळली
3 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान महापालिका आयुक्तांनी आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी वेळ मागितला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. आदेशांचे पालन न केल्याबद्दल आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावत अवमान कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
न्यायालयाने ₹5 लाखांचा खर्च लावण्याबरोबरच कारणे दाखवा नोटीसचा निर्णय होईपर्यंत आयुक्त आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन वितरित करू नये, असे निर्देश दिले. 1 डिसेंबर 2026पर्यंत आदेशांची पूर्तता करण्याचे निर्देशही सुनावणीदरम्यान देण्यात आले.
न्यायालयाचे प्रशासनावर तीव्र ताशेरे
सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आदेशांचे पालन करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे का, असा सवाल त्यांनी केला. अतिक्रमणधारकांना प्रशासनाकडून मदत केली जात असल्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली.
महापालिकेने मराठी कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी वेळ लागत असल्याचे कारण दिले होते. या स्पष्टीकरणावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांना मराठी समजत नसल्याचा दावा न्यायालयाने अविश्वसनीय असल्याचे म्हटले.
आदेशांचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश
न्यायालयाने महापालिकेला प्रथम पूर्वीच्या आदेशांचे पालन करून त्यानंतर आवश्यक असल्यास पुढील दिलासा मागण्यासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले. आदेशांची अंमलबजावणी न करता वारंवार मुदतवाढ मागण्यावर न्यायालयाने आक्षेप घेतला.
या प्रकरणात महापालिका प्रशासनाला दिलेल्या कठोर निर्देशांमुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव जागांवरील अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता निर्धारित मुदतीत आदेशांची अंमलबजावणी होते का आणि आयुक्तांच्या स्पष्टीकरणावर न्यायालय काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
