कुमारस्वामींना ‘सर्वोच्च’ धक्का
बेकायदा जमीन डिनोटीफिकेशन : न्यायालयाने याचिका फेटाळली
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेकायदा जमीन डिनोटीफिकेशन प्रकरणी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. बेंगळूर नगरविकास प्राधिकरणाने संपादित केलेली हलगेवडेरहळ्ळी येथील जमीन बेकायदेशीरपणे डिनोटीफाय केल्याचा आरोप कुमारस्वामी यांच्यावर असून यासंबंधी लोकायुक्त पोलिसांनी बी रिपोर्ट दाखल केला होता. सदर बी रिपोर्ट उच्च न्यायालयाने रद्द केला होता. यावर आक्षेप घेत कुमारस्वामींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे.
जून 2006 ते ऑक्टोबर 2007 दरम्यान कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना बेंगळूरच्या बनशंकरीजवळील हलगेवडेरहळ्ळी येथील सर्व्हे क्र. 128, 137 मधील 2 एकर 24 गुंठे जमीन बेकायदेशीरपणे डिनोटीफाय केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासंबंधी महादेवस्वामी यांनी 2012 मध्ये खासगी तक्रार दाखल केली होती. एच. डी. कुमारस्वामी यांच्याबरोबरच पद्मा श्रीदेवी, चेतनकुमार, के. बी. शांतम्मा, एस. रेखा चंद्रू, योगमूर्ती, बी. नरसिंहलू नायडू, आर. बालकृष्ण, टी. मुरलीधर, जी. मल्लिकार्जुन, ई. ए. योगेंद्रनाथ, पी. जगदीश, डी. एस. दीपक, एम. सुब्रमणी, बालाजी इन्फ्रा, शुभोदय बिल्डर्स, सनराईस बिल्डर्स आणि आरती डेव्हलपर्सच्या प्रमुखांवर आरोप करण्यात आला होता.
हलगेवडेरहळ्ळी येथील जमीन डिनोटीफिकेशन प्रकरणी लोकायुकत पोलिसांनी दाखल केलेल्या बी रिपोर्टला तक्रारदार महादेवस्वामी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने बी रिपोर्ट रद्द करून सुनावणी हाती घेतली होती. परंतु, कुमारस्वामी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.