महिलाकेंद्रीत कहाण्यांना पाठिंबा द्या
श्वेता त्रिपाठीचे प्रेक्षकांना आवाहन
श्वेता त्रिपाठीने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या ती स्वत:ची वेबसीरिज ‘ये काली काली आंखे 2’मुळे चर्चेत आहे. यात तिने अत्यंत वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली आहे. तरीही अद्याप महिला कलाकारांना फारशा चांगल्या भूमिका मिळत नसल्याचे तिचे म्हणणे आहे.
पुरुष कलाकारांना अधिक सशक्त कहाण्या मिळतात, याचमुळे प्रेक्षकांनी आता महिलाप्रधान चित्रपट आणि सीरिजना समर्थन द्यावे अशी विनंती करत असल्याचे श्वेताने म्हटले आहे. माझ्या व्यक्तिरेखा या परस्परांपेत्रा वेगळ्या असाव्यात अशी माझी इच्छा आहे. ये काली काली आंखे 2 मध्ये शिखा ही व्यक्तिरेखा माझ्यापेक्षा खूपच वेगळी आहे आणि तिच्या जगात पाऊल ठेवण्याच्या आव्हानाचा मी आनंद घेत आहे असे तिने नमूद केले आहे. या सीरिजमध्ये श्वेता ही ताहिर राजसोबत दिसून आली आहे. श्वेता त्रिपाठीने मिर्झापूर या वेबसीरिजमध्ये गोलू ही भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांनी तिच्या या भूमिकेवर प्रचंड प्रेम केले आहे.