हरित उर्जा वापरणाऱ्या उद्योगांना पाठिंबा : मुख्यमंत्री
पणजी येथे अमेझिंग गोवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांचे प्रतिपादन
पणजी : गोव्याला हरित राज्य करण्याचा हेतू असून त्यासाठीच स्वच्छ हरित उर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांना राज्य सरकार पाठिंबा देणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनच्यावतीने काल शुक्रवारी पणजीत आयोजित करण्यात आलेल्या अमेझिंग गोवा परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गोव्यात पर्यावरण पूरक हरित उर्जेवर आधारित उद्योगांना जादा प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी उद्योजकांनी गोव्यात येऊन तशा उद्योगात गुंतणवणूक करावी. गोव्याला देशाचा आर्थिक केंद्रबिंदू तयार करायचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात वाढतात हरित उद्योग
गोव्याबाबत बोलताना डॉ. सावंत यांनी पुढे नमूद केले की, हे राज्य आता पर्यटनापुरते मर्यादित राहिलेले नाही तर निसर्गाची उधळण, आवश्यक त्या सोयी, साधन - सुविधा, दोन विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बंदर अशा सर्व सेवा उपलब्ध असल्यमुळे गोवा राज्य उद्योगासाठी योग्य ठिकाण आहे. म्हणूनच गोव्यात हरित उद्योग वाढत आहेत, असा दावा डॉ. सावंत यांनी केला. गोव्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रम, अधिवेशने, परिषदा, स्पर्धा होत असून त्यात सातत्याने वाढ होते, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्याचे काम गोवा सरकारने सुरु केले आहे. गुंतवणूक वाढीसाठी गोवा सरकार विविध योजना, धोरणे आखत असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात मिनी सिलिकॉन व्हॅली देणार : गोयल
परिषदेला उद्घाटनासाठी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय उद्योग राज्यमंत्री पियुष गोयल यांनी सदर परिषदेत दिल्ली येथून ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. गोव्यात मिनी सिलिकॉन व्हॅली देण्याचा केंद्राचा विचार असून ते एक प्रकारचे डेटा सेंटर करण्यात येणार असल्याचे गोयल यांनी नमूद केले. गोव्यातील पर्यावरण पूरक उद्योग आणि हरीत उर्जेला प्राधान्य व पाठिंबा देणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.