फिरती पशुचिकित्सालये पशुपालकांना आधार
18 हजार जनावरांवर उपचार, 1962 हेल्पलाईन सेवेत : जिल्ह्यात 17 फिरती पशुचिकित्सालये
बेळगाव : पशुपालकांच्या जनावरांना घरोघरी उपचार मिळावेत यासाठी फिरता पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला पशुपालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 18 हजारहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्रा, मांजर आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात 17 फिरती पशुचिकित्सालय मिळाली आहेत. या माध्यमातून पशुपालकांच्या घरोघरी जाऊन आजारी जनावरांवर उपचार केले जात आहेत. विशेषत: यासाठी 1962 हा टोल क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.
या क्रमांकावर संपर्क साधलेल्या पशुपालकांच्या जनावरांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जात आहेत. या फिरत्या दवाखान्यातून दरमहिन्याला 70 ते 80 पाळीव जनावरांवर उपचार होऊ लागले आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील आणि डोंगराळ वाड्या, वसत्यांवर राहणाऱ्या पशुपालकांसाठी हा फिरता दवाखाना आधार ठरू लागला आहे. ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान जिल्ह्यात 5800 बैलांवर, 1973 गायींवर तर 1500 हून अधिक शेळ्या-मेंढ्यावर अशा एकूण 9667 जनावरांवर उपचार झाले आहेत. 1962 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केल्यानंतर तातडीने फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जनावरांना उपचार दिले जात आहेत.
रायबाग तालुका आघाडीवर
फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याची सुविधा घेण्यात रायबाग तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात दोन फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत उपचार केले जात आहेत. एका वर्षात 3,206 जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या-मेंढ्या आदी जनावरांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक जनावरे
20 व्या पशुधन गणनेनुसार जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, मांजर, डुकर, घोडा, गाढव, कोंबड्या आदींचा समावेश आहे. यामध्ये 13.93 लाख मोठी जनावरे आहेत. तर 15 लाख लहान पाळीव प्राणी आहेत. 77 हजार श्वान, 21 हजार डुकर तर 8 हजार घोडे आहेत.
पशुचिकित्सालय पशुपालकांना आधार ठरणारी
ग्रामीण आणि दुर्गम भागात जनावरांना वेळेत उपचार दिले जात आहेत. शिवाय पशुवैद्यकीय दवाखानाही 40 ते 50 कि. मी. अंतरावर असतो. अशा परिस्थितीत ही फिरती पशुचिकित्सालय पशुपालकांना आधार ठरणारी आहेत. थेट पशुपालकांच्या गोठ्यात येऊन जनावरांवर उपचार केले जातात.
कॉलला तत्पर उत्तर
हेल्पलाईन 1962 क्रमांकावर आलेल्या प्रत्येक दिले जाते. फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत सर्व पशुपालकांच्या जनावरांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जात आहेत. केवळ बैल, म्हशीच नव्हे तर शेळ्या-मेंढ्या, कुत्र्यांवरही उपचार केले जात आहेत.
-डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक, पशुसंगोपन खाते)