कांद्याला आधारभूत किंमत जाहीर होणार
राज्य सरकारची तयारी : अतिवृष्टीमुळे 1.80 लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याचे नुकसान
प्रतिनिधी/ बेळगाव
अवकाळी पाऊस, रोगराईमुळे नुकसान झालेल्या कांदा पिकाला किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1.80 लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याचे नुकसान झाले असून, बेळगाव जिल्ह्यात 7 हजार 350 हेक्टरपैकी 3 हजार 48 हेक्टर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्हास्तरीय बागायत पीक किंमत कपात व्यवस्थापन समितीने कांद्याला प्रति क्विंटल 3500 ते 4500 रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने प्रतिसाद दिला आहे.
मान्सूनमध्ये बेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड, गदग, हावेरी, चित्रदुर्ग, कोलार यासह विविध जिल्ह्यात 3 लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड केली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस आणि रोगराईमुळे 40 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. बेळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कांदा पिकाची बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याची कापणी करून कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी ठेवला.
सध्या कांद्याचा बाजारभाव प्रति क्विंटल 500 ते 900 रुपये असल्याचे समजते. शेतकऱ्यांना प्रति एकर कांद्याची लागवड करण्यासाठी 20 ते 30 हजार रुपयांचा खर्च येतो. राज्य सरकारने अद्याप आधारभूत किंमत जाहीर केली नसल्याने कांद्याची भाववाढही झालेली नाही. यासाठी राज्य सरकारने कांद्याही आधारभूत किंमत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.