For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ.अंजली निंबाळकर यांना कारवार जिल्हा अहिंद संघटनेचा पाठिंबा

10:27 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ अंजली निंबाळकर यांना कारवार जिल्हा अहिंद संघटनेचा पाठिंबा
Advertisement

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना समर्थन देण्याचा निर्णय अहिंद संघटनेने घेतल्याची माहिती कारवार जिल्हा अहिंद संघटनेचे अध्यक्ष चंद्रप्पा चेन्नया यांनी आज मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. कुमठाच्या माजी आमदार शारदा शेट्टी यांनी यापूर्वीच काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करून निंबाळकर यांना पाठिंबा दिला आहे. शिवाय यल्लापूरचे भाजपचे विद्यमान आमदार शिवराम हेब्बार यांचे पुत्र विवेक हेब्बार यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करून निंबाळकर यांना पाठिंबा दिला आहे. आता अहिंद संघटनेने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. चंद्रप्पा चेन्नय्या पुढे म्हणाले, काँग्रेसच्या उमेदवार डॉ. निंबाळकर यांना निवडून आणून, जिल्ह्यात बदल घडवून आणण्यासाठी मतदार उतावीळ झाले आहेत. सिध्दरामय्या मुख्यमंत्री पदाच्या खर्चीवर आरूढ झाल्यानंतर त्यांनी क्षीरभाग्य, अन्नभाग्य आदी महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

Advertisement

दिल्ली दरबारी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाल्यास आणखी पाच गॅरंटी योजना राबविण्याचे फसवे नव्हे तर ठोस आश्वासन काँग्रेसने दिले आहे. सिध्दरामय्या नेहमीच अहिंद वर्गाच्या पाठीमागे ठामपणे थांबल्याने काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय अहिंद संघटनेने घेतला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गॅरंटी योजनांची अंमलबजावणी केल्याने ग्रामीण भागातील गरिबांचे भले झाले आहे. परीणामी गरिबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. राजकीय आरक्षणामुळे सामान्य जनतेला फार मोठा लाभ आणि उपयोग झाला आहे. केवळ राजकीय आरक्षणामुळेच आपण यापूर्वी जिल्हा पंचायत सदस्य झालो, असे स्पष्ट केले. याप्रसंगी संघटनेचे गौरवाध्यक्ष बाशांसाब म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचार सभामध्ये एका विशिष्ठ धर्माला टारगेट करीत आहेत. आणि म्हणूनच केंद्रात काँग्रेस नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास देशासमोरील सर्व समस्यांचे निवारण होणार आहे. यावेळी अब्दुल करीम बाशा, डाकाप्पा चेष्ठाय्या, नागेश नाईक, विनायक चेन्नय्या आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.