For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाच आमदारांचे पाठबळ; तरीही विजयापासून दूर

11:19 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाच आमदारांचे पाठबळ  तरीही विजयापासून दूर
Advertisement

मतदारांनी आपला कौल जगदीश शेट्टर यांच्या बाजूने देऊन अवलंबले मोठे धक्कातंत्र 

Advertisement

बेळगाव : भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा कोणत्या पक्षाला मतदार साथ देणार हा संपूर्ण राज्यात औत्सुक्याचा विषय ठरला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गॅरंटी योजनांमुळे घवघवीत यश मिळाले होते. साहजिकच बेळगाव जिल्ह्यातही काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढली आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या गॅरंटी योजना व बेळगाव लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या यावरून लोकसभा मतदारसंघ कुणाच्या ताब्यात जाणार? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. काँग्रेसचे पाच आमदार असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकण्याची अधिक शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मतदारांनी भाजपला साथ देऊन काँग्रेसच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. पाच आमदारांचे पाठबळ असूनही काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयापासून मुकावे लागले आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातूनच मतदारांची अपेक्षीत साथ मिळाली नसल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत आठ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये अरभावी, गोकाक, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, सौंदत्ती व रामदुर्ग या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये बेळगाव दक्षिण, अरभावी, गोकाक या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर उर्वरित पाच मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या आमदारांची सत्ता आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजय सहज मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. राजकीय विश्लेषकांतून त्यांच्या विजयाबाबत तर्क व्यक्त करण्यात आले होते. मतदारसंघात असणाऱ्या आमदारांची संख्या, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे राजकीय वर्चस्व व मतदारांशी साधलेला संपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या होत्या. तर भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघामध्ये खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी पोटनिवडणूक लढवून विजय संपादन केला होता. मात्र, त्यांचा मतदारसंघात असणारा प्रभाव तितकासा दिसून आला नव्हता. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवारासाठी शोधाशोध सुरू होती. अनेकजण इच्छुक असले तरी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना मतदारसंघातून संधी देण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक व उपरे असा वाद निर्माण झाला होता. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा पुढे करत प्रचार सुरू केला. तर राज्यात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकारकडून राबविण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजनांचा मतदारांवर चांगलाच प्रभाव होता. यात गृहलक्ष्मी योजना सर्व मतदारांच्या तोंडी होती. विशेषकरून महिला मतदारांवर या योजनेचा विशेष प्रभाव पडला होता. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रचारादरम्यान या योजना पुढे करत मतदारांना साथ देण्याचे आवाहन केले होते.

Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मोठा धक्का...

संपूर्ण मतदारसंघ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वत: पिंजून काढला होता. प्रचारामध्येही आघाडी घेतली होती. या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी आधीपासूनच अत्यंत धोरणीपणाने रणनीती आखली. विशेषत: सर्व मंदिरांना भेटी देणे, त्यांना देणग्या देणे, तसेच जत्रा व यात्रा याठिकाणी स्वत: जाऊन देवीची ओटी भरणे यावर त्यांनी भर दिला होता. मृणाल यांच्या प्रचारासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. तर स्वत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी कंबर कसली होती. त्यामुळे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचे पारडे जड असल्याची चर्चा सुरू होती. मतदारसंघात असणाऱ्या पाच आमदारांच्या पाठिंब्यामुळे त्यांना अधिक पाठबळ मिळाले होते. मतदारसंघात प्रचारादरम्यान मतदारांकडून भरघोस पाठिंबा मिळाला होता. हे पाठबळ मतदानामध्ये रुपांतरित होऊ शकले नाही. मतदारांनी आपला कौल जगदीश शेट्टर यांच्या बाजूने देऊन मोठे धक्कातंत्र अवलंबले. त्यामुळे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मोठा धक्का बसला आहे.

Advertisement
Tags :

.