नियम धाब्यावर बसवून ‘सिव्हिल’ला औषध पुरवठा
औषधांवर ‘नॉट फॉर सेल’चा उल्लेख नसल्याने संशयाचे वातावरण
बेळगाव : गरीब रुग्णांना मोफत औषध पुरवठा करण्यासाठी सरकारकडून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची औषधे खरेदी केली जातात. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषध टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक औषधे बाहेरून लिहून देण्यात येत आहेत. औषधे खरेदी व वितरणासाठी सरकारची नियमावली असते. सर्व नियम धाब्यावर बसवून वितरकांनी औषध पुरवठा केल्याचे सामोरे आले असून कोणालाच याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. बिम्स प्रशासनाच्या बेदरकारपणामुळे काही औषधांची खुल्या बाजारात विक्री होत असल्याचा संशय आहे.
सरकारी इस्पितळासाठी औषधे पुरवताना प्रत्येक स्ट्रीपवर ‘नॉट फॉर सेल’ असा उल्लेख करणे आवश्यक असते. वेगवेगळ्या कंपन्यांकडून औषधे मागविताना अशी लेखी अट घातलेली असते. त्यामुळे कंपन्यांकडून गोळ्यांच्या स्ट्रीपवर किंवा औषधांच्या बाटल्यांवर ‘नॉट फॉर सेल’ असा उल्लेख केलेला असतो. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधून रुग्णांना जी औषधे दिली जात आहेत, त्यावर ‘नॉट फॉर सेल’चा उल्लेख नाही. त्यामुळेच औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सरकारी नियम धाब्यावर बसवून सिव्हिल हॉस्पिटलला औषधे पुरवल्याचा आरोप केला जात आहे. बिम्स प्रशासनाने यासंबंधी औषध पुरवठादार कंपनीला नोटीस दिल्याची माहिती मिळाली आहे.
औषध कंपनीला नोटीस
यासंबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे औषधांची टंचाई नाही. मुबलक साठा उपलब्ध आहे. गोळ्यांच्या स्ट्रीपवर ‘नॉट फॉर सेल’चा उल्लेख आहे. केवळ काही औषधांवर तो उल्लेख नाही. यासंबंधी कंपनीला नोटीस पाठविण्यात आली आहे. कमी मात्रेमध्ये औषधाची मागणी केल्यास स्ट्रीपवर ‘नॉट फॉर सेल’ उल्लेख करता येणार नाही, असे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे टेंडर रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.