शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा
प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम : एलअँडटीचे प्रयत्न
बेळगाव : एलअँडटी कंपनीकडून शहरात पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून सोडले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही भागात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. येत्या काळात दक्षिण आणि उत्तर भागात शुद्धीकरण प्रकल्पाचा शुभारंभ करून सुरळीत आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती एलअँडटी कंपनीने दिली आहे. शहराला एलअँडटी कंपनीकडून पाण्याचे व्यवस्थापन केले जात आहे. कंपनीने 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शिवाय 24 तास पाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्याबरोबर शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दक्षिण आणि उत्तर भागात नियोजन केले जात आहे. सद्यस्थितीत काही प्रभागामध्ये शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी घालण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या भागात जलवाहिन्या घालण्यात आल्या नाहीत त्याठिकाणी प्राधान्य दिले जात आहे. त्याबरोबर शहरातील सर्वच भागात जलवाहिन्या घातल्या जाणार आहेत. मागील 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करून पुरवठा केला जात आहे. हे सध्या प्रायोगिक तत्त्वावर असले तरी संपूर्ण शहरालाच शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.