For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओडिशातून पुरवठा... सांगली-मिरजेत साठा, बेळगावात विक्री

11:10 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओडिशातून पुरवठा    सांगली मिरजेत साठा  बेळगावात विक्री
Advertisement

बेळगावात गांजा विक्री जोमात : विद्यार्थी ठरताहेत ग्राहक

Advertisement

बेळगाव : केजीपासून पीजीपर्यंत उत्तम शिक्षणाची सोय असणाऱ्या बेळगावात अमलीपदार्थांचा वापर वाढला आहे. यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असून बेळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातूनच नव्हे तर ओडिशातूनही मोठ्या प्रमाणात गांजा बेळगावला येत आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगाव पोलीस अधूनमधून अर्धा किलो, एक किलो गांजा जप्त करून त्याची विक्री करणाऱ्यांची धरपकड करीत असतात. मात्र, प्रत्यक्षात या व्यवसायाचा आवाका मोठा असून ओडिशातून रेल्वेतून गांजा बेळगावला पाठविला जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एकेकाळी अमलीपदार्थांच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बेळगावचे नाव ठळक चर्चेत होते. मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांची वाहतूक व विक्रीसाठी बेळगाव हे प्रमुख केंद्र मानले जात होते. आता गांजा विक्री वाढली आहे. खासकरून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी हे या टोळीचे ग्राहक आहेत. पूर्वी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, रायबाग, कुडची, रामदुर्गसह वेगवेगळ्या तालुक्यातून गांजा बेळगावला यायचा. आता ओडिशातून मोठ्या प्रमाणात गांजा बेळगावला आणला जात असून त्या आधी ओडिशातील साठा सांगली व मिरज परिसरात पोहोचतो. तेथून बेळगावला तो साठा पाठविला जातो, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. बिदर पोलिसांनी आंध्रप्रदेशमधून कर्नाटक मार्गे मुंबई-पुण्याला तब्बल दीड टन गांजा मार्चमध्ये जप्त केला होता. त्यावेळीही आंध्र व ओडिशाच्या सीमेवरील जंगलातून येणारा गांजा विविध ठिकाणी कसा पोहोचवला जातो, याचा उलगडा झाला होता. मे च्या पहिल्या पंधरवड्यात आणखी पंधरा क्विंटल गांजा बिदर पोलिसांनी जप्त केला होता. त्यावेळीही गांजा पुरवठ्याचे रॅकेट उघडकीस आले होते.

 

Advertisement

Advertisement
Tags :

.