वैद्यकीय प्रवेशातून ‘पुरवणी परीक्षा’ अडथळा हटवला
राज्य सीईटी सेलचा महत्त्वपूर्ण निर्णय – प्रा. नारायण उंटवाले यांच्या पाठपुराव्याला यश
सांगली :
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत, बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचा अडथळा अखेर दूर करण्यात आला आहे. राज्य सीईटी सेलने २०२५ च्या वैद्यकीय प्रवेश माहितीपत्रकातून संबंधित वादग्रस्त नियम हटवला आहे. हा निर्णय ज्येष्ठ भौतिकशास्त्र प्राध्यापक प्रा. नारायण उंटवाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे.
सन २०२४ मध्ये झालेल्या NEET प्रवेश प्रक्रियेत नियम क्र. ६ अंतर्गत, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश नाकारण्यात आला होता. या अन्यायाविरुद्ध प्रा. उंटवाले यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच सांगली दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या निदर्शनासही त्यांनी हा मुद्दा आणून दिला. राज्यपालांनी तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
यानंतर, सीईटी सेलने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना ईमेलद्वारे आदेश पाठवून, दुसऱ्या फेरीपूर्वीच पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे स्पष्टपणे निर्देशित केले. परिणामी, यापूर्वी वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला.
या प्रकरणातील अन्याय कायमचा दूर व्हावा, यासाठी प्रा. उंटवाले यांनी शासनाच्या तक्रार कक्षात COM/ME&D/2024/182 क्रमांकाने अधिकृत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर २०२५ च्या प्रवेश माहितीपत्रकातून हा अडथळा कायमचा हटवण्यात आला आहे.
“विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अनावश्यक अडथळे येऊ नयेत, हेच माझे ध्येय आहे. पुढेही विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे प्रा. नारायण उंटवाले यांनी सांगितले.