सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल
नेहरूंना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा मलिन केल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. सध्याच्या भाजपप्रणित सरकारचे मुख्य ध्येय नेहरूंचा वारसा कमी करणे आणि नेहरूंचे योगदान इतिहासातून पुसून टाकणे हाच असल्याचे त्या म्हणाले. सरकारच्या अशा प्रयत्नांमुळे लोकशाही मूल्यांना धोका पोहोचत असल्याचा दावाही त्यांनी केला. जवाहरलाल नेहरू स्मारकात आयोजित नेहरू सेंटर इंडियाच्या उद्घाटनप्रसंगी सोनिया गांधी बोलत होत्या. नेहरूंची प्रतिमा मलीन करण्यासाठी एक संघटित मोहीम सुरू केली जात आहे. हे केवळ एखाद्या व्यक्तीला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही तर आधुनिक भारत ज्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पायावर उभा आहे तो नेहरुंचा वारसाच नष्ट करण्याचा प्रयत्न असावा अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
सोनिया गांधी यांनी आठवण करून दिली की नेहरू हे आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार होते. नियोजित आर्थिक विकास, वैज्ञानिक विचारसरणी आणि तांत्रिक क्षमतांचा विकास, धर्मनिरपेक्षता आणि सांस्कृतिक विविधतेचा उत्सव यातील त्यांचे योगदान आपल्या दैनंदिन जीवनात जिवंत आहे. आजही नेहरूंचा वारसा लाखो भारतीयांसाठी प्रेरणास्रोत आहे, असे त्या पुढे म्हणाल्या. तसेच इतिहास आणि राष्ट्रीय मूल्ये जपण्यासाठी आपण वैयक्तिक आणि सामूहिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. ही जबाबदारी केवळ नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरच नाही तर भावी पिढ्यांवरही असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. या कार्यक्रमात सोनिया गांधींनी जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडच्या (जेएनएमएफ) डिजिटल आर्काइव्हचेही कौतुक केले. या संग्रहात 1903 पासून त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंतचे साहित्य समाविष्ट असून ते स्मार्टफोनवर उपलब्ध करण्यात आले आहे.