For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

6 हजार कोटींच्या पुरवणी अंदाजपत्रकाला मंजुरी

11:10 AM Dec 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
6 हजार कोटींच्या पुरवणी अंदाजपत्रकाला मंजुरी
Advertisement

 विधानसभेत सादर : रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या 1.45 टक्के

Advertisement

बेळगाव : चालू वर्षीच्या मार्चअखेरपर्यंतचे दुसऱ्या टप्प्यातील 6,279.80 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी विधानसभेत सादर करण्यात आले. महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांनी वित्तीय कामकाजाच्यावेळी पुरवणी अंदाजपत्रक विधानसभेत मांडले. चर्चेनंतर अंदाजपत्रकाला सभागृहाची मंजुरी मिळाली. चालू वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीय आपत्ती निवारण भरपाई निधीच्या मार्गसूचीपेक्षाही अधिक भरपाई राज्य सरकारने दिली आहे. प्रतिहेक्टर 8 हजार 500 रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. यासाठी 1 हजार 15.66 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

मलनाड व किनारपट्टीच्या भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या. अशा घटना रोखण्यासाठी आपत्ती निवारण निधीतून 372 कोटी रुपये पुरविण्यात आले आहेत. ऊस उत्पादकांचे हित जपण्यासाठी राज्य सरकारने वाढीव रकमेपैकी प्रतिटन 50 रुपये देण्याचे मान्य केले आहे. यासाठी 300 कोटी रुपये लागणार आहेत. अमृत योजनेसाठी 140 कोटी रुपये, देवराज अर्स विकास निगम अंतर्गत मागासवर्गीयांच्या मदतीसाठी 150 कोटी रुपयांची तरतुदही पुरवणी अंदाजपत्रकात  करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या निवासी शाळा व विविध वसतीगृहांच्या देखभालीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुरवणी अंदाजपत्रकातील रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या 1.45 टक्के इतके आहे, अशी माहिती महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी विधानसभेत दिली. चर्चेअंती पुरवणी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.