Kolhapur News: भरदिवसा स्मशानभूमीत करणी, भानामतीचा प्रकार CCTV कॅमेरात कैद
सातत्याने सुरू असलेल्या प्रकाराने उदगाव व जयसिंगपूर परिसरात खळबळ
उदगाव : येथील कृष्णा काठावर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये काही दिवसांपासून महिला-पुरुषांकडून भरदिवसा नग्न होऊन करणी भानामतीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. सातत्याने सुरू असलेल्या या प्रकाराने उदगाव व जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
उदगाव वैकुंठधामात सुरक्षारक्षक तातडीने तैनात करण्याची मागणी करण्यात येत आहे. उदगाव येथील वैकुंठधामात उदगाव, जयसिंगपूर, संभाजीपूर, चिपरी बेघर, धरणगुत्ती (लक्ष्मीनगर), मौजे आगर आदी भागातील मृतांबर अंत्यसंस्कार केले जातात. जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
रक्षाविसर्जनादिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधामात आले होते. शिवाय वैकुंठधामातील बेडवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणाची रक्षा बाजूला ढकलून याठिकाणी बाऊली, नारळ यांच्या पूजेसह नावाच्या चिट्ठीत सुया होत्या. त्यानंतर नातेवाईकांनी रक्षाविसर्जन झाल्यानंतर याप्रकरणाचा शोध घेतला व उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली.
ग्रामपंचायतीने सीसीटीव्हीची तपासणी केली असता यामध्ये महिला, पुरुष अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार अशा दिवशी भरदिवसा नग्न होऊन अघोरी पूजा करीत असल्याचे समोर आले. सातत्याने होत असलेल्या या करणी भानामतीच्या प्रकारामुळे उदगाव, जयसिंगपूरमध्ये खळबळ उडाली आहे. हे अंधश्रद्धेचे प्रकार रोखण्यासाठी उदगाव ग्रामपंचायतीने कडक पाऊल उचलण्याची गरज आहे.
विशेषतः या वैकुंठधामाची जबाबदारी घेऊन सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी आहे. उदगाव वैकुंठधामात अघोरी व करणी भानामतीचे प्रकार सातत्याने होत आहेत. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना सर्व माहिती दिली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सरपंच सलीम पेंढारी, यांनी सांगितले.