सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे 4 ऑक्टोबरला लोकार्पण
पालकमंत्र्यांनी पाहणी करून घेतला आढावा
बेळगाव : तब्बल 188 कोटी रुपये खर्च करून सिव्हिल हॉस्पिटल आवारात उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे दि. 4 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 30 रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन तयारीची पाहणी केली. सिव्हिल हॉस्पिटल आवारात राज्य सरकारकडून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यास विलंब झाल्याने केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्याकडून मोफत तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
त्यामुळे सध्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पण सदर हॉस्पिटलचे अधिकृतरित्या लोकार्पण झाले नसल्याने 4 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते नवीन इमारतीचे लोकार्पण केले जाणार आहे. या निमित्ताने मंगळवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित केलेल्या उपकरणांसंबंधीची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दि. 4 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी आमदार असिफ सेठ, बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, प्रांताधिकारी श्रवण नाईक, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, केपीसीसी सचिव सुनील हणमण्णावर, बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी व अधिकारी उपस्थित होते.