For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुपरस्पेशालिटी रुग्णालय लवकरच सेवेत दाखल

10:24 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुपरस्पेशालिटी रुग्णालय लवकरच सेवेत दाखल
Advertisement

जवळपास सर्व काम पूर्ण : स्पेशल 11 विभागांची सोय, 250 खाटांची व्यवस्था

Advertisement

बेळगाव : जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे  काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामध्ये काही विभागही स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून सरकारकडून रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे आश्वासन दिले जात आहे. याकडे नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अद्ययावत सुविधांनी युक्त असणारे रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयात 250 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 16285.50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या रुग्णालयामध्ये विविध 11 स्पेशालिटी विभाग असणार आहेत. न्युरॉलॉजी, न्युरोसर्जरी, मेडिकल अॅण्ड गॅस्ट्रोएन्ट्रेलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रेलॉजी, पिडीअॅट्रिक सर्जरी, न्युफ्रॉलॉजी, युरॉलॉजी, कार्डिओथॉरॉसिक सर्जरी, कार्डिओलॉजी, प्लास्टिक सर्जरी, एन्डोक्रीनॉलॉजी असे 11 स्पेशल विभाग सुरू केले जाणार आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या इंजिनिअरिंग उपविभागाच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. इमारतीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. रुग्णालयामध्ये आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ व उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत उपकरणांसाठी सरकारकडे बिम्स् प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने आवश्यक उपकरणे पुरविणार असल्याचे सरकारकडून कळविण्यात आले आहे, अशी माहिती बिम्स् प्रशासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही आवश्यक असणाऱ्या बाबींची पुरेपूर दखल घेण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास त्या दरम्यान बचाव कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची दखल घेण्यात आली आहे. आगीची दुर्घटना घडल्यास आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची वाट पहावी लागणार नाही. या दृष्टीने आग विझविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची योजना करण्यात आली आहे. अशा अद्ययावत सोयीनियुक्त असणारे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत कधी दाखल होणार? याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.