मोकामा हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षकांची बदली
निवडणूक आयोगाची अन्य चार अधिकाऱ्यांवरही कारवाई
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील मोकामा येथे निवडणूक प्रचारादरम्यान दुलारचंद यादव यांच्या हत्येनंतर भारतीय निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. आयोगाने पाटणा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बदली केली आहे. तसेच एका अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने हटवलेल्या तीन अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. या कारवाईमुळे बिहारच्या प्रशासकीय व्यवस्थेत खळबळ उडाली आहे.
30 ऑक्टोबर रोजी निवडणूक प्रचारादरम्यान दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये गोळीबार झाल्यानंतर जनसुराज पक्षाचे समर्थक दुलारचंद यादव यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तथापि, पोलिसांनी पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण हृदय श्वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने बिहारचे डीजीपी विनय कुमार यांच्याकडून रविवारी दुपारी 12:00 वाजेपर्यंत कारवाईचा अहवाल मागितला आहे.
शनिवारी जारी केलेल्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, बारहचे उपविभागीय अधिकारी आणि 178-मोकामा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी चंदन कुमार यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सध्या पाटणा महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त असलेले आयएएस अधिकारी आशिष कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, एसडीपीओ बारह-1 राकेश कुमार आणि एसडीपीओ बारह-2 अभिषेक सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी 2022 आरआर बॅचचे आनंद कुमार सिंग आणि आयुष श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.