मुलांसाठी ठरली‘सुपर ट्रॅव्हलर’
600 किलोमीटरचा करते प्रवास
सर्वसाधारणपणे लोक स्वत:च्या घरातून ऑफिसला जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करतात किंवा सार्वजनिक वाहतूक सेवेतून ये-जा करतात. परंतु कुणी दररोज विमानातून ऑफिसला जात असेल तर काय?
स्वत:चे घर आणि ऑफिस एकाचवेळी मॅनेज करणाऱ्या या महिलेची कहाणी ऐकून लोक दंग होत आहेत. मलेशियात राहणारी रेच्ला कौर भारतीय वंशाची आहे आणि ती दररोज 600 किलोमीटरचा प्रवास विमानाने करत सकाळी ऑफिसला जाते आणि रात्री घरी परत येते. स्वत:च्या दोन मुलांसाठी आपण असे करत असल्याचे ती सांगते. विमानाने प्रवास केल्याने मला मुलांसोबत वेळ घालविणे आणि त्यांच्या शिक्षणात मदत करण्यास वेळ मिळतो असे तिचे सांगणे आहे. विमानप्रवासासाठी मोठा खर्च होत असेल का असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे, परंतु रेचल विमानाने प्रवासही करते आणि पैसेही यातून वाचविते.
पहाटे 4 वाजता दिनक्रमास प्रारंभ
एका युट्यूब चॅनेलने या महिलेच्या पूर्ण दिनक्रमाला कव्हर केले. ही महिला दररोज पहाटे 4 वाजता उठते आणि मलेशियाच्या पेनांग शहरातून क्वालांलपूरला जाते. क्वालांलपूरमध्ये राहण्यापेक्षा दररोज विमानाने प्रवास करणे तिच्यासाठी स्वस्त ठरते. पहाटे 5 वाजता घरातून विमानतळासाठी बाहेर पडते. पहाटे 5.55 वाजता माझ्या फ्लाइटची बोर्डिंग होते, मग विमानाने माझ्या ऑफिसपर्यंतचा प्रवास सर्वसाधारणपणे अर्धा तास किंवा 40 मिनिटांत पूर्ण होतो आणि सकाळी 7.45 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये पोहोचते असे रेचलने सांगितले.
पैसे कसे वाचतात?
प्रारंभी मी क्वालांलपूरमध्ये परिवारापासून दूर एकटीच राहण्याचा निर्णय घेतला होता. केवळ वीकेंडवर शनिवार आणि रविवारी परिवारासोबत वेळ घालवू शकत होते. क्वालांलपूरमध्ये राहणे माझ्यासाठी अत्यंत खर्चिक ठरत होते. तेथे भाड्यासाठी दर महिन्याला 474 डॉलर्स खर्च करावे लागत होते. मी दररोज विमानाने ये-जा करते. यात माझे केवळ 316 डॉलर्स दर महिन्याला खर्च होतात. विमानतळावरून ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी मला केवळ 5-7 मिनिटे लागतात. मी एअर इशिया एअरलाइन्समध्ये काम करते असे तिने सांगितले. एअरलाइन्समध्ये काम करत असल्याने तिला तिकीटदरात मोठी सवलत मिळते. अशाप्रकारच्या प्रवासातून मी दररोज ऑफिसही मॅनेज करते आणि घरी परत जात स्वत:च्या मुलांनाही वेळ देऊ शकते असे रेचल सांगते.