सुपर चेस क्लासिक : प्रज्ञानंदने गिरीला रोखले, कीमरला विजेतेपद
वृत्तसंस्था
बुखारेस्ट : ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने अनिश गिरीविऊद्ध सहज बरोबरी साधत आपल्या स्पर्धेतील प्रवास संपवला, तर व्हिन्सेंट कीमरने जॉर्डन व्हॅन फोरेस्टचा धुव्वा उडवत येथे सुपर चेस क्लासिकचे विजेतेपद पटकावले.
अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनासोबत पाच गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर राहून शेवटच्या फेरीत प्रवेश केलेल्या कीमरला डच खेळाडू फोरेस्टविऊद्ध विजय मिळवल्यास विजेतेपद पटकावण्याची उत्तम संधी होती. कीमरने चार विजय, चार बरोबरी आणि उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हविऊद्धच्या एका पराभवासह सहा गुणांवर स्पर्धेचा शेवट केला. वाशियर-लाग्रेव्हसोबत सामना बरोबरीत सुटल्यानंतर काऊआना 5.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला.
अमेरिकेच्या वेस्ली सोने शेवटच्या फेरीत सिंदारोव्हसोबतचा सामना सहज बरोबरीत सोडवला आणि उझबेक खेळाडू सिंदारोव्हसोबत पाच गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर प्रज्ञानंद, गिरी, फोरेस्ट, वाशियर-लाग्रेव्ह आणि रोमानियाचा डेक बोगदान-डॅनियल यांचा क्रमांक लागून ते सर्व समान 4.5 गुणांवर राहिले. पाचव्या फेरीनंतर एक गुण मिळवून स्पर्धेतून माघार घेतलेला अलीरेझा फिरोजा चार खेळाडूंना पुढे चाल देऊन तळाशी राहिला.
शेवटच्या फेरीत येताना गिरी स्पष्टपणे निराश होता, कारण त्याने प्रज्ञानंदविऊद्ध पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना अधिक प्रयत्न केले नाहीत. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे हा एक निमझो इंडियन डिफेन्सचा सामना होता, ज्यात गिरीच्या कॅपाब्लँका व्हेरिएशनमुळे भारतीय खेळाडूला सहज बरोबरी साधता आली. हा डाव 31 चालींमध्ये संपला.
कीमर हा स्पर्धेचा स्पष्टपणे तारा राहिला. या जर्मन खेळाडूने फोरेस्टविऊद्ध आपली वाढती समज दाखवून दिली. फोरेस्टने एक डावपेचात्मक चाल चुकवल्यानंतरही विजयात रूपांतर करणे सोपे काम नव्हते, पण कीमरने ते अगदी सहज करून दाखवले आणि 46 चालींनंतर सहज विजय मिळवला. कीमरने विजेत्याचे 1,00,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस पटकावले आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीसाठी पात्र करण्याच्या दृष्टीने जोरदार दावा केला. काऊआनानेही सिसिलियन डिफेन्सचा सर्वोत्तम प्रयत्न केला, पण एका क्षणी एकाग्रतेच्या अभावामुळे त्याला आयती मिळालेली संधी गमवावी लागली. विजयी चाल खेळण्याऐवजी काऊआनाने बचावात्मक चाल निवडली आणि त्यानंतर वाशियर-लाग्राव्हने कोणतीही संधी दिली नाही.