For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सनरायझर्स हैदराबाद-राजस्थान रॉयल्सची आज दुसरी क्वालिफायर लढत

06:15 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्सची आज दुसरी क्वालिफायर लढत
Advertisement

हैदराबादचे पॉवर हिटर्स ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मासमोर राजस्थानची फिरकी जोडी अश्विन-चहलचा लागेल कस

Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नई

सनरायझर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सशी आज शुक्रवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सामना होईल त्यावेळी आयपीएलचे सर्वोत्कृष्ट पॉवर हिटर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यासमोर चतुर फिरकी जोडी युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांचा कस लागेल. ‘ट्रेव्हिषेक’ असे या सनरायझर्सच्या स्फोटक जोडीला चाहत्यांनी प्रेमाने नाव दिलेले असून पॉवर हिटिंगला त्यांनी एका नव्या उंचीवर नेले आहे. हेड आणि अभिषेकने 96 चौकारांव्यतिरिक्त 72 षटकार खेचले आहेत. ते पुरेसे नसल्यास त्यांच्याकडे हेन्रिक क्लासेनच्या रुपाने आणखी एक फटकेबाज आहे, ज्याच्या खात्यात 34 षटकार आहेत. पण कोटला किंवा वानखेडेवर खेळणे आणि चेपॉकवर खेळणे यात फरक आहे. येथे खेळपट्टी काहीशी चिकट असते. चेंडू थांबून बॅटवर येतो आणि फटके मारणाऱ्यांना खेळणे कठीण होते. या मैदानावर मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलेल्या अश्विनला ही खेळपट्टी अगदी सरावाची आहे आणि स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याचा फॉर्म सुधारलाही आहे. त्याला साथीस देशातील सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर चहल आहे. त्यामुळे रॉयल्स हेड, अभिषेक आणि क्लासेन यांचे अडथळे त्वरित दूर करून सामन्यावर नियंत्रण मिळविण्याची आशा बाळगून असेल. सनरायझर्सच्या गोलंदाजीच्या बाबतीत पुन्हा एकदा टी. नटराजनवर मोठी जबाबदारी असेल. तो या मोसमात त्यांचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे आणि त्याला त्याच्या घरच्या मैदानावर खेळताना परिस्थितीचा फायदा उठवायला आवडेल. तसेच भुवनेश्वर कुमार आणि कमिन्स या अनुभवी जोडीला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागेल. खास करून भुवनेश्वर कुमार त्याच्या मागील दोन सामन्यांमध्ये बळी मिळवू शकलेला नाही.

Advertisement

सनरायझर्सकडे दोन दर्जेदार फिरकीपटू नसून ही त्यांची मोठी समस्या आहे. मयंक मार्कंडे हा फारसा खास नाही आणि शाहबाज अहमदचे प्राथमिक कौशल्य हे डावखुरी संथ फिरकी गोलंदाजी टाकण्याचे नाही. राजस्थान संघाने अखेरीस पाच सामन्यांमध्ये विजयापासून वंचित राहिल्यानंतर अष्टपैलू प्रदर्शनाच्या जोरावर आरसीबीला नमवून दाखविले. फलंदाजीत त्यांच्या वरच्या फळीने, विशेषत: यशस्वी जैस्वालने काही सकारात्मक चिन्हे दाखविली आहेत आणि पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी चांगला फॉर्म कायम ठेवणे त्याला आवडेल. तथापि, कर्णधार संजू सॅमसनला अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. कारण मागील तीन सामन्यांत त्याला 20 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. मधल्या फळीत ध्रुव जुरेल दबावाखाली असेल, कारण तो त्याच्या मागील दोन सामन्यांमध्ये दुहेरी आकड्यांत धावसंख्या जमवू शकलेला नाही. आरसीबीविऊद्ध काही प्रमाणात पॉवर हिटिंग केलेले कॅरिबियन गेम चेंजर्स शिमरॉन हेटमायर आणि वेस्ट इंडिजचा टी-20 कर्णधार रोव्हमन पॉवेल यांच्यावरही ते अवलंबून असतील. रियान परागने सातत्याने चांगले प्रदर्शन घडविलेले असून तो राजस्थानच्या फलंदाजीच्या मुख्य आधारस्तंभांपैकी एक आहे.

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, एडन मार्करम, अब्दुल समद, नितीश रे•ाr, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, जाथवेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फाऊकी, मार्को जेनसेन, आकाश महाराज सिंह आणि मयंक अग्रवाल.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, कुलदीप सेन, कुणाल सिंह राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युजवेंद्र चहल आणि तनुष कोटियन.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप.

Advertisement
Tags :

.