For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुन्नी गुलिस्तान मशिद दोन दिवसांसाठी सील

06:22 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुन्नी गुलिस्तान मशिद  दोन दिवसांसाठी सील
Advertisement

परिसरात तणावपूर्ण शांतता : अंतर्गत वादातून खुनाची घटना

Advertisement

प्रतिनिधी/ मडगाव

घोगळ हाऊसिंगबोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिद दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांच्या उपस्थितीत दोन दिवसांसाठी सील करण्यात आली. मशिदीबाहेर खुनाची घटना घडली होती. शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मशिद दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.

Advertisement

सुन्नी गुलिस्तान मशिदीबाहेर अली खान याच्यावर चाकूहल्ला झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात शांतता राखण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने ही मशिद पुढील 48 तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी सादर केलेल्या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला.

घोगळ हाऊसिंगबोर्डची परिस्थिती पाहता, सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्मयता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत कोणालाही मशिद परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ फातोर्डा पोलिस स्थानकाच्या तपास अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीनेच प्रवेश दिला जाईल. दोन दिवसांनंतर स्थानिक पोलिसांच्या अहवालाच्या आधारे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे नोटिसीमध्ये नमूद केले आहे.

मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्यावर नमाजानंतर चाकूहल्ला झाला, ज्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात अद्याप तणावग्रस्त स्थिती आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, मशिद परिसर व रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

चारजणांना अटक, आणखी काहीजण रडारवर

मशिदीचे उपाध्यक्ष अली कलंदर खान (वय 40) यांच्या खूनप्रकरणी दक्षिण गोवा पोलिसांनी तात्काळ अक्रम खान (45) व उबेद मकानदार (38) या दोघांना अटक केली. त्यानंतर सायंकाळी संशयित आलम सय्यद व लतिफ सय्यद यांनाही ताब्यात घेण्यात आले.

जिल्हा ऊग्णालयातही एका संशयितावर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिस व सुरक्षारक्षकांनी त्याला वाचवले. या प्रकरणी आणखी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाण्याची शक्मयता आहे.

दरम्यान, सासष्टी तालुक्यातील काही मशिदीमध्ये अंतर्गत वाद असून बऱ्याचेळा आरोप-प्रत्यारोप होताना आढळून येत आहे. काही प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचलेली आहे. या वादांवर प्रशासनाने त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा अशा खुनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यताही नाकारली जात नाही.

ज्या मशिदीमध्ये वादाची पार्श्वभूमी आहेत, अशा मशिदीच्या पदाधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी व पोलिसांनी बैठका घेऊन परिस्थिती चिघळणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे बनले आहे.

Advertisement
Tags :

.