सुनीता विलियम्स लवकरच पृथ्वीवर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. स्पेसएक्सचे अंतराळयान क्रू-10 दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) पोहोचले आहे. क्रू-10 अंतराळयानातून 4 अंतराळवीर अंतराळस्थानकावर पोहोचले आहेत. तेथे पूर्वीपासून उपस्थित सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चारही जणांचे स्वागत केले आहे.
अंतराळ स्थानकावर नव्या अंतराळवीरांना पाहुन सुनीता विलियम्स यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पुढील काही दिवसांपर्यंत अंतराळस्थानकावर पोहोचलेले नवे अंतराळवीर सुनीता विलियम्स यांच्याकडून आयएसएसची माहिती मिळविणार आहेत. निश्चित वेळापत्रकानुसार 19 मार्च रोजी सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच हे पृथ्वीच्या दिशेने रवाना होणार आहेत.
स्पेसएक्सने क्रू-10 मिशन शुक्रवारी प्रक्षेपित केली होती. फॉल्कन-9 रॉकेटद्वारे क्रू ड्रॅगन कॅप्सूलला प्रक्षेपित करण्यात आले. नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम अंतर्गत आयएसएससाठी ही 11 वी क्रू फ्लाइट आहे. ड्रॅगन अंतराळयानाद्वारे नासाचे कमांडर ऐनी मॅक्कलेन, पायलट अयर्स, जपानच्या अंतराळ संस्थेचे ताकुया ओनिशी आणि रशाच्या कोस्मोनॉट किरिल पेसकोव्ह हे अंतराळस्थानकावर पोहाचले आहेत. तर पृथ्वीवर परतल्यावर अंतराळयान अटलांटिक महासागरात उतरणार असल्याचे समजते.
9 महिन्यांपासून आयएसएसवर
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे मागील वर्षी 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. ते केवळ एक आठवड्यानंतर पृथ्वीवर परतणार होते. परंतु बोइंग स्टारलायनरमध्ये बिघाड झाल्याने दोघेही तेथे अडकून पडले. 9 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून ते आयएसएसवर अडकून पडले आहेत. 19 मार्च रोजी सुनीता विलियम्स, बुच विल्मोर यांच्यासोबत निक हॅग, गोर्बुनोव्ह हे पृथ्वीवर परतणार आहेत.
पृथ्वीवर परतल्यावर प्रारंभी त्रास
पृथ्वीवर परतल्यावर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्या शरीरात काही बदल घडू शकतात. जमिनीवर चालण्यास त्यांना काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. दोघांनीही अंतराळात 9 महिने वास्तव्य केलेले असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी ताळमेळ जमविणे त्यांच्यासाठी सोपे ठरणार नाही.