For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुनिता विल्यम्सच्या परतण्याला विलंब

06:44 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुनिता विल्यम्सच्या परतण्याला विलंब
Advertisement

फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परतण्याचे नासाकडून संकेत

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने अंतराळात पाठविलेल्या सुनिता विल्यम यांना पृथ्वीवर परत येण्यास विलंब लागणार आहे. त्या पुढच्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर परतू शकतात, अशी माहिती नासाने दिली आहे. त्यांच्यासह बॅरी विलमोर हे अंतरराळवीरही आहेत. या दोघांनाही परत आणण्याचे उत्तरदायित्व इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या संस्थेला सोपविण्यात आले आहे.

Advertisement

गेल्या 80 दिवसांपासून हे दोन्ही अंतराळवीर नासाच्या अवकाशातील अंतराळ स्थानकात अडकलेले आहेत. प्रारंभी त्यांचे अभियान केवळ 8 दिवसांमध्ये संपणार होते. तथापि, त्यांच्या बोईंग कॅप्सूलमध्ये सातत्याने तांत्रिक समस्या निर्माण होत राहिल्याने त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबत गेले आहे. अवकाशात 8 महिन्यांचा कालावधी राहून हे दोन्ही अंतराळवीर फेब्रुवारीत परततील, अशी अपेक्षा आहे.

विशेष यान पाठविणार

त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन हे विशेष यान पाठविण्यात येणार आहे. हे यान पुढच्या महिन्यात अवकाशात पाठविले जाणार आहे. मात्र, त्याला विल्यम्स आणि विलमोर अडकलेल्या अंतराळ स्थानकापर्यंत पोहचण्यास एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर हे अंतराळवीर स्थानकातून या अंतराळ यानात येतील आणि नंतर त्यांच्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ होईल. हा परतीचा प्रवासही आव्हानात्मक असेल, असे काही अवकाश तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

अन्य पर्याय धोकादायक

अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्टारलाईनर या यानाचाही विचार करण्यात आला होता. तथापि, या यानाची प्रोपेल्शन व्यवस्था अत्यंत धोकादायक आहे, असा नासाचा निष्कर्ष आहे. त्यामुळे स्टारलाईनर हे यात या दोन अंतराळवीरांना न घेताच परतणार आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.