For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुनिता विल्यम्स ‘नासा’तून निवृत्त

06:58 AM Jan 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुनिता विल्यम्स ‘नासा’तून निवृत्त
Advertisement

27 वर्षांचे देदिप्यमान योगदान, सध्या भारतभेटीवर

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी, नवी दिल्ली

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळ वीरांगना सुनिता विल्यम्स हिने आपल्या अंतराळ कार्यातून निवृत्ती स्वीकारली आहे. गेली सलग 27 वर्षे तिने या क्षेत्रात आपले अनन्यसाधारण योगदान दिले. गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या अखेरपासून तिचा निवृत्तीचा प्रारंभ झाला आहे, अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिली आहे. सुनिता विल्यम्स हिचे वय सध्या 60 वर्षे इतके आहे.

Advertisement

नासामध्ये सेवा प्रारंभ करण्यापूर्वी ती अमेरिकेच्या नौदलात होती. तिने नासामध्ये 27 वर्षांहून अधिक काळ सेवा दिली. या काळात तिने तीनदा अंतराळात प्रवास केला. नासाच्या अंतराळ प्रयोगशाळेत तिने तीनवेळा वास्तव्य केले. अंतराळ स्थानकात तिने तिच्या कार्यकाळातील एकंदर 608 दिवस वास्तव्य केले. तिने अंतराळात स्पेसवॉक करण्याचा महिलांचा विक्रम नोंदविला आहे. अंतराळ स्थानकातून ती एकंदर 9 वेळा बाहेर स्पेसवॉकसाठी बाहेर पडली होती. तिच्या स्पेसवॉकचा एकंदर कालावधी 62 तास आहे. कोणत्याही अंतराळ वीरांगनेने आजपर्यंत इतका वेळ आणि इतक्यांना स्पेस वॉक केलेला नाही. त्यामुळे तिचा हा एक अभिमानास्पद विक्रम आहे, अशी माहिती तिच्या संदर्भात देण्यात आली. तिने सलग 71 दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य करण्याचा पराक्रम केला आहे. हे अभियान प्रारंभी 7 दिवसांचे होते. तथापि, तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ते 71 दिवसांपर्यंत लांबले होते. त्यानंतर तिच्या सहकाऱ्यासह ती सुखरुप परतली होती.

भारताच्या संस्कृतीची अभिमानी

सुनिता विल्यम हिचा जन्म भारतात झालेला नाही. तथापि, तिने भारतीय संस्कृतीसंबंधी सदैव अभिमान बाळगला आहे. कर्म आणि विचार या दोन्ही दृष्टींनी तिने नेहमीच भारतीय संस्कृती अंगिकारल्याचे दिसून येते. अंतराळात प्रवास करतानाही तिने आपली भारतीय संस्कृती आचरली होती. 6 डिसेंबर 2006 या दिवशी तिने अंतराळात जाताना स्वत:सह भगवद्गीता आणि उपनिषदांचे ग्रंथ नेले होते. त्यावेळी तो जगभर मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. भारताचा जगप्रसिद्ध खाद्यपदार्थ असणारा सामोसाही तिने त्यावेळी स्वत:समवेत नेला होता. अंतराळात भगवद्गीता आणि उपनिषदांचे वाचन केल्याने आपल्या आत्मविश्वास आणि धैर्य असेच संतुलन सुरक्षित राहिले, असे तिने नंतर प्रतिपादन केले होते. आपले अंतराळ अभियान आटोपल्यानंतर तिने भारताला 2007 मध्ये भेट दिली. त्यावेळी राष्ट्रीय विज्ञान केंद्रातील एका कार्यक्रमात तिने आपले अंतराळ वास्तव्याचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले होते. त्यावेळी तिने भगवद्गीता आणि उपनिषदांचा उल्लेख केला होता. भगवद्गीतेचे वाचन ती नेहमी करते, अशी माहिती दिली जाते.

निवृत्तीची घोषणा भारतातच

अंतराळ क्षेत्रातील 27 वर्षांच्या योगदानानंतर तिने तिच्या निवृत्तीची घोषणा भारतातच दिल्ली आयआयटी महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात नुकतीच केली आहे. आपल्या प्रदीर्घ अंतराळ वास्तव्यातील रोमांचक अनुभव तिने या कार्यक्रमात मांडले आहेत. आपले हे अनुभव भविष्यकाळात मानवाच्या अंतराळ वास्तव्यासाठी उपयोगी ठरतील, असा विश्वास तिने व्यक्त केला. मानवाचा प्रयत्न चंद्रावर वास्तव्य करण्याचा आहे. त्यादृष्टीने अनेक देश प्रयत्न करीत आहेत. अनेक खासगी कंपन्याही चंद्रावर मानवाला घेऊन जाण्यास सज्ज झाल्या आहेत. हे सर्व प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आपला अनुभव उपयुक्त आहे, असे तिचे म्हणणे आहे.

भारताविषयी अभिमान

सुनिता विल्यम्स यांनी आपला मूळ देश असणाऱ्या भारताविषयी नेहमीच अभिमान व्यक्त केला आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील वैभवी कामगिरीचीही तिने प्रशंसा केली आहे. अंतराळात वास्तव्य केलेला भारताचा अंतराळवीर शुभांशू शुक्लाचे तिने कौतुक केलेले होते. यापुढेही तिचा भारताला उपयोग होणार आहे.

Advertisement
Tags :

.