सुनिता विल्यम्स सुखरुप परत
जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव, नासाचे अभियान यशस्वी, पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन
► वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
नऊ महिन्यांहून अधिका काळाच्या खडतर अंतराळ वास्तव्यानंतर अंतराळ वीरांगना सुनिता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर सुखरुप पुनरागमन झाले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या अंतराळ स्थानकातून, ‘स्पेसएक्स ड्रॅगन’ या अंतराळ यानातून हे दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे 3 वाजून 35 मिनिटांनी पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना घेऊन येणाऱ्या यानाचे, पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतानजीक समुद्रात अवतरण झाले. अंतराळवीरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांचे अंतराळ अभियान यशस्वी झाल्याने जगभरात आनंद व्यक्त होत आहे. भारतातील नागरीकांना तर विषेश आनंद झाला आहे, कारण सुनिता विल्यम्स या मूळच्या भारतीयच आहेत. गुजरातमध्ये त्यांच्या मूळ गावी त्या सुखरुप परतल्यानंतर मध्यरात्रीपासूनच आनंदोत्सवाला भरते आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले असून भारतातील अनेक मान्यवरांनीही त्यांचे कौतुक केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे अभिनंदन केले. अभियान यशस्वी झाल्यामुळे नासाचीही प्रशंसा होत आहे.
असा झाला परतीचा प्रवास
नासाच्या अंतराळ स्थानकात तब्बल 286 दिवसांच्या सलग वास्तव्यानंतर गेल्या शनिवारपासूनच त्यांच्या परतीच्या प्रवासाच्या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला होता. त्यांना परत आणण्यासाठी, प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीची निर्मिती असणारे ‘स्पेसएक्स ड्रॅगन’ पाठविण्यात आले होते. हे यान रविवारी अंतराळ स्थानकाला जोडले गेले. या यानातून दोन अंतराळवीर आणि तंत्रज्ञानांही पाठविण्यात आले होते. काही वेळात सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी या अंतराळ स्थानक सोडून या यानाच्या विशेष कक्षात प्रवेश केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी या यानाला अंतराळ स्थानकापासून विलग करण्यात आले. त्यानंतर त्वरित त्याच्या पृथ्वीकडच्या प्रवासाला प्रारंभ करण्यात आला. साधारणत: 17 तासांच्या परतीच्या प्रवासानंतर बुधवारी पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी हे यान समुद्रात अवतीर्ण झाले. त्यानंतर काही मिनिटात विल्यम्स आणि विल्मोर सुहास्य वदनाने यानाबाहेर आले. त्यांना भूमीवर घेऊन येण्यासाठी विशेष नौकेची व्यवस्था करण्यात आली होती. नासाचे अनेक वरीष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी फ्लोरिडा सागरतटावर उपस्थित होते.
आठ दिवस ते नऊ महिने
अमेरिकेच्या नौदलातील माजी अधिकारी सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी नासाच्या अंतराळ स्थानकात काम करण्यासाठी निवड झाली होती. 5 जानेवारी 2024 या दिवशी त्यांनी बोईंग स्टारलाईनर या यानातून पृथ्वी सोडली होती. पहिल्या योजनेनुसार त्यांचे वास्तव्य केवळ आठ दिवसांचेच होते. तथापि, स्टारलाईनर यानात तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ते प्रक्षेपणासाठी निकामी असल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे अंतराळ वास्तव्य लांबत गेले. नव्या यानातून त्यांना परत यावे लागल्याने मध्ये इतका मोठा कालावधी गेला. त्यामुळे त्यांच्या परतीसंदर्भात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अखेरीस त्यांचे सुटका अभियान यशस्वी झाले आहे.
स्पेसएक्सलाही विलंब
गेल्या सप्टेंबरातच स्पेसएक्स यानातून त्यांना परत आणण्याची योजना होती. तथापि, तांत्रिक आणि अन्य कारणास्तव या यानाच्या प्रक्षेपणालाही विलंब होत गेला. नंतर स्पेसएक्स ड्रॅगन यानातून त्यांना आणण्यासाठी चार अंतराळवीर न पाठविता केवळ दोनच पाठविण्यात आले. त्यामुळे यानाच्या कक्षात अधिक जागा राहिल्याने त्यांचा परतीचा प्रवास अधिक सुखकर झाला, अशी माहिती दिली गेली.
45 दिवसांचा पुनर्वसन कार्यक्रम
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी 45 दिवसांचा पुनर्वसन कार्यक्रम (रिहॅबिलिटेशन) निर्धारित करण्यात आला आहे. अंतराळात प्रदीर्घ वास्तव्य केल्याने त्यांच्या शरिरावर कोणते परिणाम झाले आहेत, याचे सखोल परीक्षण या काळात करण्यात येईल. त्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता असेल तर तेही करण्यात येतील. मानसिकदृष्ट्याही अंतराळ वास्तव्य अतिशय कठीण असते. त्यामुळे त्यादृष्टीनेही त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर दोन्ही अंतराळवीर त्यांच्या दैनंदिन जीवनाला पुन्हा आरंभ करु शकणार आहेत. मात्र, येत्या तीन ते चार दिवसांमध्ये त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडविली जाईल.
राजकीय रंगही...
सुनिता विल्यम्स यांच्या परतीच्या अभियानाला राजकीय रंगही प्राप्त झाला होता. अनेकदा त्यांच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडल्याने अमेरिकेत त्यावेळी असणाऱ्या जेसेफ बायडेन प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले होते. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारकाळातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. बायडेन प्रशासनाने या दोन्ही अंतराळवीरांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी प्रचार काळात केला होता. बायडेन प्रशासनावर मोठी टीकाही त्यावेळी झाली होती.
आश्वासनाची पूर्ती
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत आपला विजय झाल्यास विल्यम्स आणि विल्मोर यांना अंतराळातून परत आणण्यात येईल, असे आश्वासन डोनाल्ड ट्रंप यांनी निवडणूक प्रचार काळात दिले होते. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ट्रंप यांनी 20 जानेवारीला घेतली. त्यानंतर दोन महिन्यांपेक्षाही कमी काळात त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले आहे. दोन्ही अंतराळवीर परतल्यानंतर व्हाईट हाऊसने प्रसारित केलेल्या संदेशात ट्रंप यांनी आश्वासनाची पूर्ती केल्याचा उल्लेख केला गेला आहे.
अंतराळात 608 दिवस...
सुनिता विल्यम्स यांचे हे तिसरे आणि सर्वात कठीण असे अंतराळ वास्तव्य होते. आतापर्यंत त्यांनी अंतराळात 608 दिवस वास्तव्य केले आहे. हा तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम आहे. यापूर्वी पेगी व्हिटसन या अंतराळवीराने अवकाशात एकंदर 675 दिवस वास्तव्य पेले आहे. मात्र, विक्रम रशियाचे अंतराळलीर ओलेग कोनोनेंको यांच्या नावावर असून त्यांनी अंतराळत एकंदर 878 दिवस वास्तव्य केले आहे. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी आपल्या 286 दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात 4 हजार 576 वेळा पृथ्वीप्रदक्षिणा केली आहे. तसेच एकंदर 19 कोटी 50 लाख किलोमीटर इतक्या अंतराचा अंतराळ प्रवास केला आहे.
माजी इस्रोप्रमुखांकडून अभिनंदन
भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख आणि थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी नासाचे विशेष अभिनंदन हे अभियान यशस्वी केल्यासाठी केले आहे. नासा आणि स्पेसएक्स यांच्या एकमेकांशी असलेल्या सहकार्यामुळे हे अभियान सुफळ झाले. अवकाश संशोधनाच्या कार्यात खासगी कंपन्यांचा सहभाग किती मोलाचा ठरतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे त्यांचे व्यक्तव्य आहे. अंतराळ संशोधन संस्था इस्रोनेही दोघांचे अभिनंदन केले असून त्यांची, तसेच नासाची कामगिरी अतुलनीय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला अंतराळ क्षेत्रात बलवान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दोन्ही अंतराळवीरांचा अनुभव त्यांना उपयोगी पडेल, असा संदेश इस्रोने प्रसारित केला.
झुलासन गावात आनंदीआनंद
सुनिता विल्यम्स यांचे गुजरातमधील मूळ गाव झुलासन येथे त्यांचे पृथ्वीवर आगमन झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण गावाने त्यांचा परतीचा प्रवास टीव्हीवर रात्री जागून पाहिला. त्यांचे यान समुद्रात अवतीर्ण झाल्यानंतर गावाच्या आनंदाला पारावार उरला नाही. फटके वाजवून आणि एकमेकांना मिठाई भरवून गावाने आनंद साजरा केला. विल्यम्स यांचा परतीचा प्रवास सुखरुप व्हावा, म्हणून गावात दोन दिवस आधीपासूनच पूजा आणि प्रार्थना केल्या जात होत्या. त्या फलदायी ठरल्याचा आनंद गावकऱ्यांना वाटत होता.
शरीरप्रकृतीसाठी अपायकारक
अंतराळात प्रदीर्घकाळ वास्तव्य हे अंतराळवीरांच्या शरीरप्रकृतीसाठी अपायकारक असते, असे प्रतिपादन स्पेस अप्लिकेशन सेंटरचे प्रमुख नीलेश एम. देसाई यांनी केले आहे. मानवासाठी अंतराळ वास्तव्याची मर्यादा केवळ सहा महिन्यांची आहे. तथापि, हे दोन अंतराळवीर त्यापेक्षा तीन महिने अधिक काळ तेथे रहिले आहेत. यातून शास्त्रज्ञाना आणि आरोग्य विषयक संशोधकांना नवी संधी प्राप्त झाली आहे. नऊ महिन्यांच्या अंतराळ वास्तव्यानंतर अंतराळवीरांच्या प्रकृतीवर कोणते परिणाम होतात, याचे संशोधन त्यांच्याकडून आता पेले जाईल. ते संशोधन पुढच्या अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरेल, अशीही टिप्पणी देसाई यांनी केली.
व्हाईट हाऊस भेटीचे आमंत्रण
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन्ही अंतराळवीरांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊस भेटीचे आमंत्रण दिले आहे. दोन्ही अंतराळवीर त्याच्या अंतराळ वास्तव्याचा शीण गेल्यानंतर, तसेच त्यांची सर्व आरोग्यविषयक परीक्षणे झाल्यानंतर व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयाला भेट देणार आहेत.
अंतराळ वास्तव्याचे शरिरावर परिणाम
प्रदीर्घ अंतराळ वास्तव्याचे शरिरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. शरीर कार्यरत ठेवण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या द्रवपदार्थांच्या रचनेत परिवर्तन होऊ शकते. तसेच गुरुत्वाकर्षण अंतराळात अत्यल्प असल्याने शरीरांतर्गत असणारा नैसर्गिक दबाव कमी झालेला असतो. त्यामुळे स्नायू आणि मज्जासंस्था यांच्यावर विपरीत परिणाम होणे शक्य असते. न्यूरो ऑक्युलर सिंड्रोममुळे दृष्टीवर अल्प ते मोठा परिणाम झालेला असू शकतो. कॅलशियम शरिरात वाढल्याने मूत्रपिंडात खडे निर्माण होऊ शकतात. गुरुत्वाकर्षण अभावामुळे मेंदूकडे होणाऱ्या रक्तपुरवठ्यात कमतरता आलेली असू शकते. फुप्फुसे आणि पचन संस्थेच्या कार्यशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. शारिरीक हालचाल किंवा व्यायाम फारसा करता येत नसल्याने स्नायू निर्बल होऊन हातापायांचा आकार कमी झालेला असू शकतो.
सुनिता विल्यम्स खात काय होत्या
अंतराळ वास्तव्यात सुनिता विल्यम्स यांचा आहार कोणता होता, यासंबंधी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. अंतराळवीरांसाठी विशेष प्रकारच्या आहाराची व्यवस्था केलेली असते. त्यांच्यासाठी निर्जल केलेले पॅकड् अन्नपदार्थ पाठविण्यात येतात. बरेच दिवस हे पदार्थ टिकतील अशा प्रकारे बनविलेले असतात. फ्रीझ ड्राईड भोजन, थर्मोस्टॅबिलाइझ्ड अन्नपदार्थ, पिण्यासाठी पाणी इत्यादी सोय असते. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी पिझ्झा, भाजलेले चिकन, विविध प्रकारचे श्रिंप्स, सुकामेवा आणि सुक्या भाज्या उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.