सुनीता विल्यम्सचे पुनरागमन लांबणीवर
रॉकेट प्रक्षेपण यंत्रणेत बिघाड : 280 दिवसांपासून अंतराळ स्थानकात अडकून
वृत्तसंस्था/फ्लोरिडा
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून परतणे पुढे ढकलण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे नासाने अंतराळ स्थानकात नवीन क्रू घेऊन जाणारे मिशन क्रू-10 चे प्रक्षेपण पुढे ढकलले आहे. हे प्रक्षेपण बुधवार, 12 मार्च रोजी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने लाँच होणार होते.
स्पेसएक्सचे क्रू-10 मिशन प्रक्षेपणाच्या फक्त एक तास आधी पुढे ढकलण्यात आले. रॉकेटच्या ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्मच्या हायड्रॉलिक सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे क्रू-10 मिशन पुढे ढकलण्यात आले आहे. आता 14 मार्च रोजी ही मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सुनीता विल्यम्स यांची अंतराळातील मोहीम फक्त आठ दिवसांत संपणार होती. मात्र, ती आता 280 दिवसांहून अधिक म्हणजे नऊ महिन्यांहून अधिक काळ चालू आहे. तथापि, सुनीता विल्यम्सचे पुनरागमन अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नासाचे बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट मिशन 5 जून 2024 रोजी लाँच करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत नासाने सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना आठ दिवसांच्या अवकाश मोहिमेवर पाठवले. दोघांनाही स्टारलाइनर अंतराळयानातून रवाना करण्यात आले. स्टारलाइनर अंतराळयानाचे अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाणारे हे पहिले उ•ाण होते.
सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचा भाग आहे. अमेरिकन खासगी उद्योगांच्या भागीदारीत अमेरिकेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सुरक्षित, विश्वासार्ह आणि कमी किमतीच्या मानवयुक्त मोहिमा पाठवणे हे नासाचे ध्येय आहे. हे चाचणी अभियान याच उद्देशाने सुरू करण्यात आले होते. या मोहिमेचे उद्दिष्ट स्टारलाइनरची अंतराळ स्थानकात सहा महिन्यांच्या रोटेशनल मोहिमा करण्याची क्षमता दाखवणे होते. दीर्घ कालावधीच्या उ•ाणांपूर्वी तयारी तपासण्यासाठी आणि आवश्यक कामगिरी डेटा गोळा करण्यासाठी क्रू फ्लाइट टेस्टची रचना करण्यात आली होती.