For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Politics : सुनील माने यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ठोकला रामराम

03:13 PM Nov 09, 2025 IST | NEETA POTDAR
satara politics   सुनील माने यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ठोकला रामराम
Advertisement

                             उपमुख्यमंत्री अजित पवार गटात करणार प्रवेश

Advertisement

वाठार किरोली : रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आपल्या पदाचा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. रहिमतपूर मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुनील माने यांनी ही माहिती दिली. त्यांच्या समवेत धामणेरचे माजी सरपंच शहाजीराव क्षीरसागर व वाठार किरोली जिल्हा परिषद गटाचे नेते संभाजीराव गायकवाड, रहिमतपूर चे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांची उपस्थिती होती.

यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सुनील माने म्हणाले की गेली दहा ते अकरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षपदी काम करत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर वैयक्तिक कारणामुळे अजितदा गटात प्रवेश केला नव्हता, परंतु रहिमतपूर व परिसरातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर अजितदादा गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Advertisement

येत्या ९ तारखेला संध्याकाळी सहा वाजता रहिमतपूर येथील गांधी चौकात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असून यावेळी कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड यांच्यासहित रहिमतपूर मधील अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांचा हा प्रवेश सोहळा होणार आहे .

यावेळी शहाजीराव क्षीरसागर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व सर्व समावेशक आहे. परिसराच्या व गावच्या हिताचा विकासाचा विचार करून अजितदादा गटात प्रवेश करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे .उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या माध्यमातून परिसराच्या विकास कामासाठी भरीव निधी उपलब्ध होऊ शकतो. तसेच कार्यकर्त्यांचेही मत अजितदादांच्या गटात प्रवेश करण्याचे झाले होते, यामुळे आम्ही शरदचंद्र पवार गटातून अजितदादा गटात प्रवेश करत आहे .

सुनील माने यांनी शरदचंद्र पवार गटात दिलेला राजीनामा हा शरदचंद्र पवार तसेच माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे .राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर जिल्ह्यातून अनेक नेत्यांनी अजित दादा गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावला होता .त्याचवेळी सुनील माने हे अजित दादांचे कट्टर समर्थक समजले जात असताना त्यांनी मात्र शरदचंद्र पवार गटाची जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळून ठेवली.

परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीतही पक्षाला सातारा जिल्ह्यात मोठ्या पराभवाचे तोंड पहावे लागले होते. तरीही सुनील माने यांनी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात चांगला जनसंपर्क ठेवला होता. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील माने यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासाठी धक्कादायक ठरणार आहे .

Advertisement
Tags :

.