सुनील गावस्कर विनोद कांबळीला देणार दरमहा 30 हजारांची मदत
वृत्तसंस्था/ मुंबई
सध्या गंभीर आरोग्य समस्यांशी झुंजणाऱ्या विनोद कांबळीला सुनील गावस्कर यांनी आयुष्यभर मदत करण्याचे वचन दिले आहे. गावस्कर त्यांच्या चॅम्प्स फाउंडेशनच्या माध्यमातून 1 एप्रिलपासून कांबळीला दरमहा 30 हजार ऊपये देणार आहेत आणि वैद्यकीय खर्चासाठी आणखी वार्षिक 30 हजार ऊपये देणार आहेत.
1993 ते 2000 दरम्यान भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळलेल्या कांबळीला अलीकडच्या काळात आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. 1999 मध्ये स्थापन झालेल्या चॅम्प्स फाउंडेशनकडून मदत मिळवणारा तो सलीम दुराणीनंतरचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. जानेवारीमध्ये वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमावेळी भावूक झालेला कांबळी गावस्करच्या पाया पडला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
’गेल्या वर्षी कांबळीच्या बिघडत्या प्रकृतीबद्दल कळल्यापासून गावस्कर यांची त्याला मदत करण्याची इच्छा होती. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी गावस्कर कांबळीवर उपचार करणारे डॉ. शैलेश ठाकूर आणि अन्य एका डॉक्टरला तसेच मला भेटले. कांबळीच्या प्रकृतीची पूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चॅम्प्स फाउंडेशनला तातडीने आर्थिक आणि वैद्यकीय मदत सुरू करण्याचे निर्देश दिले, असे गावस्कर यांचे जवळचे मित्र अनिल जोशी यांनी सांगितले आहे.