सुनील छेत्री इज बॅक!
आठ महिन्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला मागे : भारतीय फुटबॉल संघातून पुन्हा खेळण्याचे संकेत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री निवृत्तीनंतर पुनरागमन करणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने सुनील छेत्रीच्या पुनरागमनाला दुजोरा दिला आहे. गत वर्षी 6 जून रोजी कुवेतविरुद्धच्या सामन्यानंतर सुनील छेत्रीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला होता. मार्च 2025 पासून सुरू होणाऱ्या आगामी फिफा आंतरराष्ट्रीय विंडोमध्ये भारतीय संघाला मदत करण्यासाठी सुनील छेत्रीने हा निर्णय घेतला आहे. 25 मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध आशियाई चषक 2027 पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत तो खेळणार आहे.
भारतीय संघ 19 मार्च रोजी फिफा इंटरनॅशनल विंडोसाठी मालदीवसोबत एक मैत्रीपूर्ण सामना खेळेल. त्यानंतर, 25 मार्च रोजी, भारतीय संघ एएफसी आशियाई कपच्या तिसऱ्या फेरीत बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल. हे दोन्ही सामने मेघालयातील शिलाँग येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेळवले जातील. एआयएफएफने सोशल मीडियावर सुनील छेत्रीचा फोटो शेअर केला असून ‘सुनील छेत्री परत आला आहे! असे ट्विट केले आहे.
गतवर्षी केले होते अलविदा
सुनील छेत्रीने शानदार कारकिर्दीनंतर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एका वर्षाच्या आत हे पाऊल उचलले आहे. त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय फुटबॉलमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी अजून भरून काढणं अद्याप बाकी आहे. भारताचा सर्वकालीन आघाडीचा गोल-स्कोअरर छेत्रीने गेल्या वर्षी जूनमध्ये कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अर्थात, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, छेत्री इंडियन सुपर लीगमध्ये बेंगळुरू एफसीकडून खेळत राहिला आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला आगामी स्पर्धेमध्ये निश्चित होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर
सुनील छेत्री हा भारतातील महान फुटबॉलपटूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय गोलच्या बाबतीत छेत्री ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीच्या यादीत सामील झाला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत सुनील छेत्री तिसऱ्या स्थानावर आहे. छेत्रीने 2005 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा पदार्पण सामना पाकिस्तानविरुद्ध होता आणि त्याच सामन्यात त्याने पहिला गोलही केला. त्याने आपल्या कारकिर्दीत 151 सामन्यात 94 गोल केले आहेत. निवृत्तीनंतर माघार घेतल्यानंतर, सुनील छेत्रीला 100 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत सामील होण्याची संधी मिळेल.