सुनेत्राताईंची कसोटी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची झालेली निवड अपेक्षितच म्हटली पाहिजे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासारख्या लोकनेत्यांनी आजवर राष्ट्रवादीचे खंबीरपणे नेतृत्व केले. त्यामुळे नेतृत्वाचे शिवधनुष्य पेलणे हे सुनेत्राताईंपुढचे निश्चितच मोठे आव्हान असेल. स्वाभाविकच पुढचा टप्पा हा त्याच्ंयाकरिता कसोटीचा असून, त्यावरच त्यांचे पक्षात भवितव्य अवलंबून असणार आहे. मागच्या 28 जानेवारी रोजी अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. हा अपघात की घातपात, याविषयीचे गूढ वाढत असतानाच पक्षातील नेतृत्व कुणाकडे सोपवायचे, याविषयी मागच्या काही दिवसांपासून ऊहापोह सुरू होता. प्रारंभी प्रफुल्ल पटेलादी राजकारण्यांचे नाव पुढे आल्यानंतर पक्षातूनच त्याला कडाडून विरोध झाल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची झालेली निवड ही महत्त्वाची म्हटली पाहिजे. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाची अलीकडे भाजपाशी मोठ्या प्रमाणात सलगी वाढली आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांबद्दलही कार्यकर्त्यांच्या मनात शंकाकुशंका होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची निवड करणे भाग पडले, असेच म्हणता येईल. अजित पवार हे दोन, तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून फुटून महायुतीमध्ये सामील झाले. तथापि, अखेरच्या श्वासापर्यंत आपला स्वतंत्र बाणा कायम ठेवण्यास त्यांनी प्राधान्य दिले. पुरोगामी विचार हाच आपल्या पक्षाचा पाया आहे, असे अजित पवार सांगत. पक्षाध्यक्षपदाच्या निवडीनंतर सुनेत्रा पवार यांनीही हाच सूर कायम ठेवत मित्र पक्षांबरोबरच स्वपक्षातील उतावीळ नेत्यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. अजितदादांनी कायम शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा जपला. त्याच्याशी तडजोड केली जाणार नाही, हे प्रथम ताईंनी निदर्शनास आणून दिले. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी ताराबाई आणि आजे सासूबाई शारदाबाई पवार यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचा निर्धारही सुनेत्राताईंनी बोलून दाखवला. त्यातून त्यांचा धोरणीपणा आणि विचारीपणा उठून दिसतो. वास्तविक पवार घराण्यातल्या पहिल्या राजकारणी म्हणजे शारदाबाई पवार. शरद पवार यांच्या मातोश्री आणि अजितदादांच्या आजी. सुनेत्राताईंच्या त्या आजेसासू. शारदाबाई यांचा जन्म छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानातला म्हणजे कोल्हापूरातला. स्त्री शिक्षण आणि सुधारणावादी विचारांतून त्यांची जडणघडण झाली. तर गोविंदराव पवार हे सत्यशोधक चळवळीतून पुढे आलेले. शारदाबाई यांच्यात उपजत नेतृत्वगुण होते. दोघा पती, पत्नींचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यातून 1938 च्या जूनमध्ये शारदाबाई यांनी जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि त्या बिनविरोध निवडूनही आल्या. पुढे 14 वर्षे त्यांनी लोकल बोर्ड गाजवले. कोणत्याही कौटुंबिक कारणासाठी लोकल बोर्डाची त्यांनी बैठक चुकवली नाही. खरे तर त्यांची वैचारिक जडणघडण साम्यवादी म्हणजेच डाव्या चळवळीतून झाली. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाशीच त्या मनाने जोडल्या गेल्या. पुढे शरद पवार यांनी काँग्रेसची वाट धरली. अजितदादांनीही तोच कित्ता गिरवला. परंतु, शारदाबाईंचा पुरोगामीत्वाचा वारसा पवार कुटुंबातल्या कुणीही सोडला नाही. सुनेत्राताईंच्या भाषणातूनही पुन्हा एकदा हेच अधोरेखित झाल्याचे दिसून येते. अजित पवार भाजपसोबत गेले. मात्र, संघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयापासून म्हणजेच रेशीमबागेपासून दूर राहणेच त्यांनी पसंत केले. सुनेत्राताई मात्र संघाच्या कुठल्या तरी कार्यक्रमात दिसल्याचा फोटो व्हायरल झाला. किंबहुना, त्यांनीही पुरोगामीत्वाचा झेंडा आपण सोडणार नसल्याचे सांगत आपल्या पक्षातील काही अतिउत्साही नेत्यांनाही सबुरीचा सल्ला दिलेला दिसतो. फडणवीस यांनीही अनेकदा राष्ट्रवादीसोबतची युती ही वैचारिक नाही, तर मुद्द्यांवर, विकासावर आधारित असल्याचे स्पष्ट केले आहे. हे बघता सुनेत्राताईंनी याबाबत स्पष्टता राखण्यातून त्यांच्या नेतृत्वाचीच झलक पहायला मिळते. तसा ताईंना माहेरकडूनही राजकीय वारसा मिळालेला आहे. त्यामुळे राजकारण त्यांना नवीन नाही. पण, एकाच वेळी पक्षबाह्या व पक्षांतर्गत अशा दोन्ही आव्हानांशी त्यांना सामना करावा लागेल. तो करण्यास आपण समर्थ आहोत, हेच त्यांच्या विधानांतून तसेच देहबोलीतून पहायला मिळते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता, बसपच्या सर्वेसर्वा मायावती, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांसारख्या अनेक महिलांनी आतापर्यंत विविध पक्षांचे नेतृत्व केले. महिलाही पक्ष सांभाळू शकतात, जनाधार मिळवू शकतात, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. सुनेत्राताईंनाही या महिला नेत्यांप्रमाणेच आपले अस्तित्व सिद्ध करावे लागेल. महाराष्ट्राचा राजकीय पट सध्या विलक्षण गुंतागुंतीचा बनला आहे. भाजप, काँग्रेस, दोन सेना, दोन राष्ट्रवादी यांच्यासह अन्य छोटे मोठे पक्ष राज्यात आहेत. अजित पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सातत्याने चर्चा झडत होत्या. परंतु, अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा मुद्दा जवळपास मागे पडलेला दिसतो. सध्या शरद पवार यांची प्रकृतीही ठीक नाही. त्यामुळे शरद पवार यांचा राष्ट्रवादीही संक्रमणावस्थेतून जात आहे. तर अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा काळात पक्ष पुन्हा उभा करणे, सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना दिशा देणे, पक्षाचा विस्तार करणे, याला सुनेत्राताईंना प्राधान्य द्यावे लागेल. तूर्तास तरी राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत. 2029 मध्ये मात्र लोकसभा, विधानसभा व त्यानंतर इतर निवडणुकांचा फड रंगेल. या निवडणुका स्वबळावर लढण्याचा पवित्राही भाजपकडून घेतला जाऊ शकतो. हे बघता आगामी काळात सुनेत्राताईंच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने कसोटी लागेल.