सुनेत्राताई होणार उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना कळविला होकार : -राष्ट्रवादीच्या विधिमंडळ सदस्यांच्या आजच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब
प्रतिनिधी/मुंबई
उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल याबाबत चर्वितचर्वण सुरू झाले. या चर्चांच्या दरम्यान शुक्रवारी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार कळविला आहे. त्यामुळे आज शनिवारी सकाळी राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत त्यांची विधानमंडळातील गटनेत्या म्हणून निवड होऊन शिक्कामोर्तब होणार आहे. यानंतर दुपारी दोन वाजता विधानभवनात बैठक होईल. यानंतर संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे.
आज उपमुख्यमंत्रीपदाची सुनेत्राताई पवार शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या उपमुख्यमंत्री लाभणार आहेत. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीकडे असणारे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि आमदारांनी उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना मिळावे याबाबतचे एकमत मुख्यमंत्री फडणवीस यांना कळविण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनीही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागणीला सहमती दर्शविली होती. मात्र सुनेत्री पवार यांचा होकार आवश्यक होता. मात्र त्यांना दु:खातून सावरायला अवधी मिळाला पाहिजे म्हणून काही धार्मिक होण्यापर्यंत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी धीर धरला होता. आज अस्थिविसर्जन झाल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य महत्त्वाच्या नेत्याने राजकीय सल्ला देणारे, अजित पवारांच्या जाहिरातीचे काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी आज दुपारी पवार कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला. तसा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे शनिवारी सकाळी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत त्यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड होणार आहे.
विधीमंडळ गटनेत्याची निवड
पक्षाकडून होत असलेल्या आग्रहानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकरण्यास मान्यता दिली आहे. अजित पवारांच्या जाहिरातीचे काम पाहण्राया डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी, राष्ट्रवादीच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची त्या पदावर निवड होणार आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली बैठक
अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर पाच बड्या नेत्यांची बैठक झाल्याचे समजते. त्यामध्ये हा निर्णय झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे. त्यानुसार शनिवारीच सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाची खाती आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न
अजित पवार यांच्याकडे अर्थखाते, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खाते होते. ही महत्त्वाची खाती कुणाला द्यायची यावरही खलबतं केली जात आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचे असलेले अर्थखाते आपल्याकडेच राहावे असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
भाजपासह सरकार दादांच्या कुटुंबियांच्या पाठीशी : फडणवीस
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणार असल्याबाबत विचारले असता, राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी सरकार म्हणुन आणि भारतीय जनता पक्ष म्हणुन आम्ही पुर्णपणे उभे राहु असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित दादांचे कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल, ते जो काय निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असेल, माझ्यासोबत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली,मात्र त्यांचा पक्षच अंतिम निर्णय घेईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सुनेत्राताईंची निवड करण्याचे ठरवले : भुजबळ
छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर मोठे वक्तव्य केले आहे. अजित दादांचे आकस्मिक जाणे म्हणजे झोप उडाल्यासारखी स्थिती झाली आहे. शो मस्ट गो ऑन म्हणतो तसे कोणावर तरी जबाबदारी देऊन हे चालवावे लागेल, असे भुजबळ म्हणाले. विधानमंडळाचे सदस्य, विधानसभेचे आमदार असतील, विधानपरिषदेचे सदस्य आहेत, त्यांची बैठक बोलावली आहे. त्याच्यामध्ये सीएलपी नेता म्हणजे विधानमंडळ पक्षाचे प्रमुख जे पद अजित पवार यांच्याकडे होते, ते पद सुनेत्रा पवार यांच्याकडे जावे अशा काही लोकांच्या सूचना आहेत. शेवटी विधानमंडळाचे सदस्य निर्णय घेतील, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.