For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुनेत्रा पवारांच्या ‘पॉवर प्ले’ने दिग्गजांमध्ये अस्वस्थता

06:07 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुनेत्रा पवारांच्या ‘पॉवर प्ले’ने दिग्गजांमध्ये अस्वस्थता
Advertisement

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी अवघ्या काही तासात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांच्या चितेची धग कायम असताना एकीकडे राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊ नये, यासाठी दोन मतप्रवाह असल्याचे राज्याने पाहिले. सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्यात आले, मात्र गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बॉस कोण? तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील कुरघोडींवर सत्ता असल्यास कशीही मात करता येते, मात्र पक्षांर्तगत विरोधकांचा सामना करणे यातच नेत्याची खरी कसोटी असते. सुनेत्रा पवारांचे सक्रिय होणे हे पक्षातील दिग्गज नेत्यांना अस्वस्थ करणारे आहे. राज्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे दबदबा कायम ठेवणाऱ्या सुनेत्रा पवारांची खरी कसोटी आता सुरू होणार आहे.

Advertisement

अजित पवारांच्या निधनानंतर राज्य विधीमंडळाचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या, त्या घडामोडी बघता राष्ट्रवादी अजित पवार गटातच दोन गट आहेत की काय? अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऊपाली चाकणकर यांना पहिल्यांदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर आला, या व्हिडीओमुळे राष्ट्रवादीतच कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा रंगली. ऊपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा होऊ नये, यासाठी तटकरे यांनी आपली ताकद लावली. पण सुनेत्रा पवारांनी त्यांना पक्षाच्या पदाचा देखील राजीनामा देण्याचे निर्देश दिले, तर दुसरीकडे नरहरी झिरवळांना तुर्तास दिलेले अभय लक्षात घेता, राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडी पाहता, पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पक्षांर्तगत संघर्षाला सुरूवात झाली ती सुनेत्रा पवारांच्या लेटर बॉम्बने. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईपर्यंत जी पत्रे पाठवली गेली, त्या पत्रामंध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांची मोठी भूमिका होती. पण या काळातील सर्व पत्रव्यवहार रद्द करावा तो अधिकृत मानू नये, अशी भूमिका सुनेत्रा पवारांनी घेतल्याने पक्षात तटकरे आणि पटेलांच्या वर्चस्वाला सुरूंग लागल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहीत पवार यांनी अधिवेशनात अजित पवारांचा अपघात नसून घातपात असल्याचे सांगत, महाराष्ट्रात जरी एफआयआर घेण्यात आला नाही तरी कर्नाटक राज्यात त्यांनी केलेला झिरो एफआयआर त्यांनी विधानसभेत दाखवला. त्याच वेळी पवार यांनी थेट पटेल आणि तटकरे यांना राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करायचा असल्याचा गंभीर आरोप करताना एकच खळबळ उडवून दिली, तर तटकरे यांनी देखील दिल्ली सोडत महाराष्ट्रात येत रोहित पवारांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना मला अधिक बोलायला लावू नका असा इशारा दिला. मे महिन्यात विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत, त्यात काही जागा या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला येणार आहेत, याच जागेवर तटकरे यांनी ऊपाली चाकणकर यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा होती. मात्र त्यापूर्वीच भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण बाहेर आल्याने चाकणकरना डबल राजीनामा द्यावा लागला, या प्रकरणात चाकणकर आणि तटकरे यांनी हाताचे बोट अनामिका कापून विधी केल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे चाकणकरांबरोबर आता तटकरे यांचाही राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे, दुसरीकडे रविवारी रायगडमधील एका कार्यक्रमात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो किंवा फलक न लावल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला स्वत: सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. पक्षाचे सर्वेसर्वा आणि पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षांच्या फोटोचा विसर पडतोच कसा, इतर कोणत्याही राजकीय पक्षात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा फोटो न टाकल्याची बाब कधीच होताना दिसत नाही. त्यामुळे हा प्रकार बघता सुनिल तटकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे, की पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, हे येत्या काळात कळेलच. दुसरीकडे राज्यात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात महिलांचे झालेले लैंगिक शोषण बघता सर्वच पक्षातील महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची यावर काहीच प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र आदिती तटकरे यांनी फोटो न लावल्याबाबत सोशल मीडियावर सारवासारव करणारी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे अजित पवार गटातील पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी तटकरे आणि पटेल यांच्यावर टीका केली आहे, तर राष्ट्रवादी विलीनीकरणाची पुन्हा चर्चा रंगू लागली असून ज्या मंत्री दत्ता भरणेंनी सुरूवातीला ऊपाली चाकणकरांची बाजु घेतली, तेच भरणे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात जर पक्षाचे विलीनीकरण होणार असेल, तर त्यात गैर काय अशी भूमिका मांडली. मात्र पक्षाचे विलीनीकरण झाल्यास राष्ट्रवादी शरद पवार गटातील जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे तसेच इतर ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे महत्त्व वाढू शकते. त्यामुळे अजित पवार गटातील काही दिग्गजांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Advertisement

पुन्हा एकदा विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका निवडणूकीनंतर अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या बैठकीचा जो तपशील सांगितला जातो, जे फोटो व्हायरल करण्यात आले, त्यात ना तटकरे होते ना पटेल. भाजपला म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा ठेवणाऱ्या एकनाथ शिंदेंपेक्षा राष्ट्रवादी केव्हाही जवळची वाटते. त्यात राष्ट्रवादीला आपल्या कलेने भाजपला चालवता येईल तर दुसरीकडे राष्ट्रवादी सोबत असल्याने शिंदेंचे महत्त्व देखील कमी करता येते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका यामध्ये महत्त्वाची असणार आहे. पण एक मात्र नक्की सुनेत्रा पवार अॅक्टीव्ह मोडमध्ये येणे हे पक्षातील दिग्गजांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम करताना सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची आता खरी परीक्षा असणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.