सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पदाची व गोपनियतेची दिली शपथ
प्रतिनिधी, मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान दुर्घटनेत निधन झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी शनिवारी निवड केली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी ‘अजितदादा अमर रहे’ ‘एकच वादा अजित दादा’ या घोषणांनी कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या आठवणी जागवत वातावरण अधिकच गंभीर बनवले. त्याचवेळी ‘सुनेत्रावहिनी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या.
अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड
उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या सदस्यांनी राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या गटनेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आणि पक्षनेते म्हणून सर्व संवैधानिक निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले. त्यामुळे अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा म्हणून सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले. त्याचबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सुनेत्रा पवार यांना या महत्त्वाच्या खात्यापासून डावलले
सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजित पवारांकडे असलेले अर्थखाते मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते हे खाते आमच्या पक्षाला मिळावे अशी मागणी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री पदावरून महायुतीत वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता भाजप अर्थमंत्रीपदावरील दावा सोडणार का? तसेच राष्ट्रवादीला हे खाते मिळाल्यास या खात्याची जबाबदारी कोण सांभाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुनेत्रा पवार बारामतीकडे रवाना
उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार बारामतीकडे रवाना झाल्या. अजित पवारांच्या दशक्रियाविधीपर्यंत त्या बारामतीत राहणार आहेत.
शपथविधी सोहळ्यास पवार कुटुंबीय गैरहजर
मोठ्या दु:खद परिस्थितीत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होत्या. पण पत्नीसह उपस्थित असलेले जय पवार वगळता पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शपथविधी सोहळ्यास हजर नव्हते. अजित पवारांचे दुसरे चिरंजीव पार्थ पवार बारामतीतच थांबले होते. प्रतिस्पर्धी पक्षाचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना या सोहळ्याची माहिती नसल्याचे सांगत त्यांनी अनभिज्ञता दाखविली. इतकेच नव्हे तर सुप्रिया सुळे आज दिल्लीसही रवाना झाल्या. त्यामुळे विलीनीकरणाची शक्यता असलेली राष्ट्रवादी दुभंगलेलीच राहते की काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
नव्या आशेने पुढे चालत राहीन! : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भावना
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या विचारांना उजाळा देत शनिवारी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, असे सुनेत्रा पवार यांनी एक्स या समाज माध्यमातील पोस्टमध्ये म्हटले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव -शाहू -फुले -आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरश: भरून येत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.
अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील’, अशा भावना व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.
अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रसंग कठीण होता... पण, ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही...पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकीर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.
विलीनीकरणाची दादांची इच्छा पूर्ण व्हावी
शरद पवारांची अपेक्षा, 12 तारीख निश्चित झाली होती...
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण करण्यावर एकमत झाले होते आणि हा निर्णय जाहीर करण्यासाठी अजितदादांनीच 12 तारीख निश्चित केली होती. मात्र, हा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. दादांची जी इच्छा होती, ती पूर्ण व्हावी अशी आमचीही इच्छा आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही, मी सकाळी वाचले, परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळे असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर घडलेल्या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. या चर्चेचे नेतृत्व स्वत: अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण करण्याचे एकमत झाले होते आणि हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यासाठी अजित दादांनीच 12 तारीख निश्चित केली होती. मात्र, हा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. दादांची जी इच्छा होती, ती पूर्ण व्हावी अशी आमचीही इच्छा आहे, असे म्हणत पवारांनी भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.