राष्ट्रवादीचा चेहरा सुनेत्रा पवार, मेंदू कोण?
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात निधनानंतर रक्षा विसर्जन होताच सत्तेचा निर्णय घेण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. कदाचित त्या एकत्रित राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री असतील! पवारांचे काही पाठीराखेही या मंत्रिमंडळात येतील. राष्ट्रवादीचा सत्तेतील चेहरा सुमित्रा पवार असतील पण, मेंदू कोण असेल? शरद पवार की भाजपा?
हे एक खुले सत्य आहे की, जेव्हा जेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवृत्तीचा विचार केला, तेव्हा तेव्हा त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहून त्यांना पुन्हा सूत्रे आपल्या हाती घ्यावी लागली. आता एप्रिल महिन्यात राज्यसभेतील खासदारकीची मुदत संपून पवार राजकारणातून निवृत्ती घेणार, जाता जाता आपल्या बरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांचे एकत्रीकरण करून राष्ट्रवादी एकसंघ करणार आणि अजित पवार यांच्या पाठीशी उभी करून सुप्रिया सुळे यांचे राजकारण केंद्रात स्थिर करणार, इतरांची व्यवस्था योग्य पद्धतीने लावून स्वत: त्यापासून दूर होणार अशी अटकळ बांधली जात होती. मात्र क्रूर नियतीला हे मान्य नसावे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काकांच्या छत्रछायेखालून बाहेर पडून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी होत असतानाच विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सत्तेचे दुर्दैव असे की, पतीच्या निधनाचे दु:ख दूर करण्याची उसंत देखील न घेता अश्रू पुसून श्रीमती सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास संमती देण्याची वेळ आली आहे. पवार घराण्याच्या परंपरा लक्षात घेता सुनेला नेतृत्व देणे त्यांच्यासाठी अवघड ठरणारे नाही. पण या निर्णयात पवारांच्या होकारापेक्षा सुद्धा प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ आणि काही अंशी मुश्रीफ, झिरवळ अशा मंडळींचा हातभार अधिक असण्याची आणि त्यांच्या तोंडून भाजपनेच हे वदवून घेतले असण्याची शक्यता अधिक आहे.
विलनीकरणाच्या बैठकीत सुनेत्रा पवार
ते काही असले तरी सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री लाभेल. राजकारणापासून त्या दूर दिसत असल्या तरी राजकीय घराण्यातील असल्याने त्या अलिप्त नव्हत्या. अगदी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी झालेल्या दहाही बैठकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सोबत घेतले होते. जयंत पाटील यांच्या मुंबईतील घरी झालेल्या बैठकीला देखील सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. त्यामुळे एका अर्थाने अजित पवार यांनी आपला वारसा आपल्या पत्नीकडे सोपवलेलाच होता. त्यामध्ये आपल्या दोन्ही पुत्रांना परिपक्व होण्यास अद्याप वेळ असल्याचे त्यांच्या पूर्णत: ध्यानी आलेले होते. दुर्दैवाने दादांचे निधन झाले आणि ही जबाबदारी महाराष्ट्रातील एका कुटुंबवत्सल स्त्राrला पेलावी लागत आहे.
या निर्णयानंतर पुढे काय घडेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तरीही प्रफुल्ल पटेल आणि तटकरे सोडता उर्वरित दोन्ही राष्ट्रवादीतील नेते शरद पवारांच्या शब्दाला ऐकतील. पटेल दबाव आणायला आणि तटकरे राज्यात काय घडावे हे ठरवण्यात भाजपच्या मदतीने हस्तक्षेप करत राहतील. थोडक्यात भाजपचा स्टेक कायम ठेवायचा प्रयत्न करतील. शरद पवार थेट सत्तेत सामील होणार नाहीत आणि अशा स्थितीत जबाबदारी पण घेणार नाहीत. पण, पवार कुटुंबातील लोकांची पदावरील संख्येबाबतची भूमिका ते कायम ठेवतील.
ज्यामुळे दादांच्या एका पुत्राचा राजकारण प्रवेश सुकर होईल. तोच विधानसभा लढवेल आणि मंत्रीही होईल अशी आज परिस्थिती असली तरी नेमका तोच तिढा पण आहे. शरद पवारांच्या कोट्यातून जयंत पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे यांच्यापैकी किती येतील माहिती नाही पण रोहित आर आर पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल. राजकारणाचा पोत डावा की उजवा की मध्यममार्गी स्वीकारायचा हा गोंधळ इथे कायम राहील. रोहित पवार व सुप्रिया सुळे यांना सबुरीचा सल्ला दिला जाईल. लोकाग्रह झाला म्हणून त्यांना काही जबाबदारी मिळतील. पण, उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजप वरिष्ठांच्या संमतीने घेतला असे दाखवून ते नावही त्यांच्याकडूनच निश्चित केले हे स्पष्ट केले जाईल. त्यांचे अनेक निर्णय राष्ट्रवादीला तापदायक ठरतील. त्याबद्दल कोणाला तक्रारही करता येणार नाही. काही करून तीन वर्षात या सगळ्यात पुन्हा ऐक्य घडू दिले जाणार नाही. त्यात काळाच्या पोटात काय दडलेय हा संभ्रम आहेच. सत्तेत आले म्हणून सावध काम न करता आमदार, खासदार वादग्रस्त वक्तव्य, कृती करून आपल्यापुरते आसन बळकट करायचा प्रयत्न करतील.
अजितदादा पवार परिवार पक्षाबाहेरून नेहमी अस्वस्थ ठेवला जाईल. काँग्रेस आणि शिवसेना, डावे पक्ष यांच्यापासून राष्ट्रवादीला एकटे पाडले जाईल. पवारांच्या राजकारणाला देखील यामुळे बट्टा लागेल तो वेगळाच. गौतम अदानी यांच्यामुळे पवार यांच्यावर दोष आहेच त्यात धर्मनिरपेक्ष मते खेचून घेऊ शकला नाही तर राष्ट्रवादीची भाजपला गरज उरणार नाही. काँग्रेस सक्षम होऊ नये यासाठी त्यांना राष्ट्रवादीचे धर्मनिरपेक्षपण शिल्लक ठेवणे आणि त्यासाठी एका वर्गाला दुसऱ्यापासून कायम दूर ठेवण्याचे राजकारण चालू ठेवावे लागेल.
परिणामी राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? आणि पक्षाच्या कृतीमागील मेंदू कुणाचा? हे प्रश्न कायमच राहतील. सुनेत्रा पवार या खेळीचे आकलन कसे करतात, शरद पवार जनतेमध्ये प्रतिमा असणाऱ्या आपल्या आमदार, खासदारांना या सगळ्यात कसे जपतात, एकीकडे सत्तेचा लाभ मिळावा अशी अपेक्षा असणारे अनुयायी, दुसरीकडे पवार घराण्यातील इतरांचे महत्त्व कमी करण्याचे राजकारण, तिसरीकडे स्व पक्षातील मोठ्या नेत्यांचे पुनर्वसन आणि पक्षाचे हरवत चाललेले अस्तित्व पुन्हा सुस्थितीत ठेवण्यासाठी करायचे राजकारण या सगळ्या खेळात पवारांना पुन्हा उतरावे लागणार आहे.
आता भाजपला जातीवादी म्हणून दूर ठेवणे त्यांना शक्य दिसत नाही. अजितदादांच्या मृत्यूने एक अपरिहार्य राजकारण त्यांच्यावर लादले गेले आहे. तसेही अदानींच्यामुळे त्यांच्यावर तो ठपका होताच. आता काँग्रेसच्या पायातील बेड्या सुटणार आहेत. त्यांनाही आपले वेगळेपण सिद्ध करावे लागणार आहे. शिवसेनेचीही तीन पायांच्या शर्यतीतून सुटका झाली असली तरी स्वत:चे राज्यकारण लोकांच्या समोर आणावे लागेल. केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण नेतृत्व सुद्धा उभे करावे लागणार आहे. या सर्वांच्या समोर भाजप मोठे आव्हान आहे ते वेगळेच.
शिवराज काटकर