रविवारची रात्र राज्यासाठी ‘घातवार’
एका रात्रीत तीन भीषण अपघात : 18 जणांचा मृत्यू : 10 गंभीर जखमी
रविवारची रात्र राज्यासाठी घातवार ठरली. रविवारी रात्री विविध भागात झालेल्या तीन अपघातांनी महाराष्ट्र हादरुन गेला. रायगड जिह्यातील आंबेनळी घाट, धुळ्याजवळील लळींग घाट आणि अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर हे अपघात झाले आहेत. या भीषण दुर्घटनांमध्ये तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 26 जण गंभीर जखमी आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात स्कार्पिओ दरीत कोसळून आठ तरुणांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात मुंबई- आग्रा महामार्गावर लळींग घाटात झालेल्या तिहेरी अपघात सह जण ठार झाले. तर 26 जण गंभीर जखमी झाले. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर एसटी बस आणि दुचाकी यांच्या भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण ठार झाले.
त.भा. प्रतिनिधी
रायगड : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटाने पुन्हा एकदा मृत्यूचे भयावह रूप दाखवले. दाभीळ टोकाजवळ स्कॉर्पिओ वाहन तब्बल 800 फूट खोल दरीत कोसळून आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली. कोकणातील सहलीचा आनंद लुटून घरी परतणाऱ्या मित्रमंडळींचा प्रवास कायमचा थांबला. सातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील पाच युवकांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमधील वाहनचालक संदीप अशोक काटकर (वय 35) हे आसगाव येथील रहिवासी होते. तर अंश समीर चव्हाण हा अवघ्या 18 वर्षांचा असून या दुर्घटनेतील सर्वांत तरुण सदस्य ठरला. याशिवाय महेश अनिल पवार (25), आदित्य अशोक साळुंखे (21), रितेश राजेंद्र लोखंडे (25) आणि सुहास जितेंद्र लोखंडे (20) हे चौघेही आसगाव येथील रहिवासी होते. उत्कर्ष आनंदा शिंगटे (21) आणि निखील अभिमन्यू शिंगटे (25) हे दोघे मर्ढे गावातील रहिवासी होते. त्यामुळे अपघाताची बातमी समजताच आसगाव आणि मर्ढे गावांमध्ये शोककळा पसरली. अनेक कुटुंबांतील तरुण सदस्य एकाच दुर्घटनेत गमावल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. अंश हा मुळचा रत्नागिरी जिह्यातील बोरगाव येथील असून आसगाव हे त्याचे आजोळ आहे. मागील काही वर्षांपासून तो आजोळीच रहात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आसगाव व परिसरातील आठ तऊण दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी सहलीसाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर आनंदाचे क्षण घालवल्यानंतर शनिवारी रात्री ते स्कॉर्पिओ वाहनातून परतीच्या प्रवासाला निघाले. मध्यरात्रीनंतर वाहन आंबेनळी घाट चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दाभीळ टोकाजवळील सुमारे हजार फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला आणि वाहनातील सर्व आठ जणांचा जागीच मृत्यु झाला. रात्रीचा अंधार आणि घाटातील अतिशय दुर्गम भाग यामुळे प्रशासनाला अपघाताची माहिती मिळण्यास काहीसा उशीर झाला.
अंधारामुळे बचावकार्यात अडचणी
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, सह्याद्री ट्रेकर्स, पोलादपूरमधील स्थानिक बचाव पथके तसेच महाड येथील सिस्केप संस्थेच्या स्वयंसेवकांनी तातडीने शोध व बचाव मोहिमेला सुरुवात केली. रविवारी रात्री आठच्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम सलग रात्रभर आणि सोमवारी दिवसभर सुरू होती. दरीची प्रचंड खोली, घनदाट जंगल, निसरडे उतार, उंच कडे आणि रात्रीचा अंधार यामुळे ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली. दुर्बिणी, दोरखंड, हार्नेस आणि इतर तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने बचाव पथके दरीत उतरली. सुरुवातीला दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र उर्वरित मृतदेह अत्यंत दुर्गम ठिकाणी अडकले असल्याने सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभीळ गावाच्या बाजूने दरीच्या तळाशी पोहोचण्याचा पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सोमवारी संध्याकाळी सायंकाळपर्यंत सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. 
मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात तिहेरी अपघात; 6 ठार, 26 जखमी
प्रतिनिधी : धुळे
मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळेजवळच्या लळींग घाटात रविवारी मध्यरात्री भीषण तिहेरी अपघात होऊन सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 26 प्रवासी गंभीर जखमी झाले. रेतीचा डंपर, ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात झालेल्या या भीषण धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रॅव्हल्स बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.
प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास लळींग घाट परिसरात रेतीने भरलेला डंपर आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग पथक आणि टोल कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना वाहनांतून बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असतानाच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने अपघातग्रस्त ट्रक आणि डंपरला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रॅव्हल्स बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. बसच्या केबिनमधील काही प्रवासी आणि मदतकार्य करत असलेला एक टोल कर्मचारी गंभीररीत्या चिरडला गेला. या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत.
अहिल्यानगर-कल्याण मार्गावर एसटीने दुचाकीला चिरडले, चौघे जागीच ठार
जुन्नर, प्रतिनिधी
पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच दुचाकीवरील चार तरुण ठार झाले. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील हॉटेल जीवनदीपजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी-पाथर्डी एसटी बस माळशेज घाटमार्गे ओतूरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी दुचाकीवरून चार तरुण डिंगोरेकडे निघाले होते. रात्री सुमारे आठच्या सुमारास डिंगोरे गावच्या हद्दीत जीवनदीप हॉटेलजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघात इतका जबरदस्त होता की दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या दुर्घटनेत खंडू नारायण भले (25), शिवराम नारायण पारधी (26), दीपक सखाराम भले (28) आणि आशिष ढवळू भले (24) या चार तरुणांचा मृत्यू झाला.