Kurundwad Election : कुरुंदवाडमध्ये रविवार ठरला प्रचाराचा सुपर संडे.....!
राजर्षी शाहू आघाडी, काँग्रेस व भाजपची दमदार पदयात्रा
कुरुंदवाड : येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक मतदानाला सातच दिवस बाकी असल्याने आजच्या रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त सादर येथील सर्वच उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधला. यामुळे आजचा रविवार प्रचाराचा "सुपर संडे 'ठरला.
राजर्षी शाहू विकास आघाडी चे प्रमुख आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षाच्या उमेदवारासह नगरसेवकाच्या उमेदवारांनी सोबत श्री गणेश दर्शन घेऊन पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले गटातटाच्या राजकारणामुळे गेल्या 40 वर्षापासून या शहराचा विकास खुंटला आहे. यासाठी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन येथे आम्ही निवडणूक लढवत आहोत. शहराजवळ दोन नद्या असून नागरिकांच्या घशाला "कोरड 'आहे. येत्या वर्षभरात हा प्रश्न निश्चित मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर अंडरग्राउंड ड्रेनेज व्यवस्था सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असे महत्वकांक्षी प्रकल्प राबवून शाहू आघाडी निश्चित या शहराचा चेहरा बदलेल यासाठी जनतेने शाहू आघाडीच्या पाठीशी ठाम राहावे असे आवाहन केले.
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील आदी भाषणे झाली. शहरातील विविध भागासह भैरववाडी परिसरात ही पदयात्रा काढून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. काँग्रेसच्या वतीने ही प्रचारात आघाडी घेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिनी पाटील यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांनी आज पदयात्रेसह "घर तू घर 'प्रचार करत रविवारच्या सुट्टीचा उपयोग करून घेतला.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना पुरोगामी विचाराच्या कुरुंदवाड शहराला लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराचे अनेक प्रश्न सोडवले आहेत उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून कामे केली जाणार आहेत.
भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड समीरा जोशी यांच्यासह 16 जागेवर उभे केलेल्या उमेदवारांनी ही आज रविवार सुट्टी निमित्त पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला यावेळी भाजपाचे कुरुंदवाड निवडणूक प्रभारी पोपट पुजारी म्हणाले की मंत्री चंद्रकांत दादा पाटील, डॉ संजय पाटील, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते माधवराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल उभे केले असून प्रस्थापितांच्या मक्तेदारीला मूठ माती देण्यासाठी आमचा हा लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजश्री शाहू आघाडी, इंडियन नॅशनल काँग्रेस, व भारतीय जनता पार्टी च्या उमेदवारांनी आज पदयात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उठवला.