सूर्यकिरणांचा अंबाबाईला सोनेरी अभिषेक
कोल्हापूर :
उत्तरायण पर्वातील सुऊ असलेल्या किरणोत्सवाच्या दुसऱ्याच्या (गुरुवारी) दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे मुखकमल उजळले. सायंकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी चरणस्पर्श करत पुढील 5 मिनिटात सूर्यकिरणे अंबाबाईचे मुखकमल उजळून सोडत मळवटापर्यंत पोहोचली. सूर्यकिरणांचा हा प्रवास पाहताना अंबाबाईच्या मूर्तीवर जणू सोनेरी अभिषेकच होत असल्याची अनुभूती भाविकांना आली. अंबाबाईच्या मूर्तींपर्यंत पोहोचलेल्या सूर्यकिरणांची पाहणी आधुनिक बनावटीच्या मॅग्नेटो मीटरच्या सहायाने तर केलीच, शिवाय अंबाबाई मंदिराच्या महाद्वारापासून अंबाबाईच्या मूर्तीवर येत राहिलेल्या सूर्यकिरणांची दिशाही तपासली.
दरम्यान, सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सूर्यकिरणे अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून मंदिर आवारात आली होती. ही वेळ पकडून किरणोत्सवाला सुरुवात झाल्याचे गृहीत धरले. यावेळी सूर्यकिरणांची तीव्रता तब्बल 16 हजार 700 लक्स (एका स्क्वेअर मीटरच्या जागेत एका मेणबत्तीतून पडणारा प्रकाश हा एक लक्स अशा प्रमाणात मोजला जातो.) इतकी होती. यानंतर पुढील चाळीस मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणे मंदिरातील कासव चौकात आली. येथून 6 वाजून 2 मिनिटांपासून पुढील 3 मिनिटात अंबाबाईच्या गाभाऱ्याच्या चांदीच्या उंबरठ्यावर सूर्यकिरणे गेली. यावेळी मात्र सूर्यकिरणांची तिव्रता फक्त 132 लक्स इतकी होऊन गेली होती. यानंतर पुढील 7 मिनिटांनंतर सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचे चरण स्पर्श केले. तसेच गुडघा, कमर, खांदा, चेहरा असाही प्रवास करत 6 वाजून 16 मिनिटांनी सूर्यकिरणे अंबाबाईच्या कपाळी असलेल्या मळवटापर्यंत पोहोचली. यानंतर एक मिनिट सूर्यकिरणे चरणांपासून ते मळवटावर अखंडपणे स्थिरावली. त्यामुळे अंबाबाईचे मुखकमल तर उजळलेच, मूर्तीला जणू सूर्यकिरणांचा सोनसळी अभिषेक होऊन गेला. सूर्यकिरणांनी उजळून निघालेल्या अंबाबाईच्या मूर्तीचे तेजोमय ऊप पाहून भाविकांना मोठी प्रसन्नता मिळाली.
- चांगले वातावरण...चांगली दिशा...
बऱ्याच वर्षींनी अंबाबाईच्या किरणोत्सवासाठी चांगल्या वातावरणासह सूर्यकिरणांची दिशाही चांगली लाभल्याचे मॅग्नेटो मीटरच्या सहाय्याने केलेल्या पाहणीत दिसून आल्याचे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थ विज्ञान विभागाचे अॅडज्कंट प्रोफेर डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले. गेल्या काही वर्षानंतर प्रथमच किरणोत्सवाला चांगले वातावरण लाभले. मंदिरात फक्त 45 टक्के आर्द्रता होती. शिवाय निरभ्र आकाश, हवाही स्वच्छच होती. धुलीकणही अगदी कमी होते. त्यामुळे सूर्यकिरण चांगल्या पद्धतीने होऊन शकला, असेही कारंजकर म्हणाले.