For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर परिसरात ऊन-पावसाचा खेळ

10:39 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहर परिसरात ऊन पावसाचा खेळ
Advertisement

पावसाची उघडझाप, अधूनमधून सरी : पीक वाढीसाठी दमदार पावसाची गरज

Advertisement

बेळगाव : मागील चार दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात अधुनमधून पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. रविवारी दिवसभर पावसाची उघडझाप पाहावयास मिळाली. त्याबरोबर ऊन-पावसाचा खेळ अनुभवयास मिळाला. विशेषत: जून महिना संपला तरी म्हणावा तसा पावसाला जोर नसल्याचेही दिसत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाची उघडझाप सुरू आहे.

हवामान खात्याने यंदा समाधानकारक आणि दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र जून संपला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आहे. त्यामुळे आता जुलै महिन्यात तरी दमदार पाऊस होईल का? असा प्रश्न पडू लागला आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगली सलामी दिल्याने अनेक भागातील शिवारांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला होता.त्यामुळे पेरणीची कामे वेळेत झाली होती. मात्र आता पिकांच्या उत्तम वाढीसाठी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

Advertisement

यंदा बॅकलॉग भरून निघणार का?

गतवर्षी पावसाळ्यात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे गतवर्षीचा बॅकलॉग यंदाच्या पावसाळ्यात भरून निघणार का? असा प्रश्न पडत आहे. गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे नदी, विहिरी आणि जलाशयांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली होती. उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. आता यंदाच्या पावसाळ्यात तरी गतवर्षीचा बॅकलॉग भरून निघावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकसकोप जलाशयाची पाणी पातळी अद्याप स्थिर आहे. जून महिन्यात झालेल्या पावसामुळे दोन्ही जलाशयांच्या पाणी पातळीत अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठाही जैसे थेच सुरू आहे. जिल्हा प्रशासनातर्फे पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. मात्र अद्याप पूर निर्माण होईल, असा पाऊस झालेला नाही.

Advertisement
Tags :

.