सनफार्माकडून ऑरगॅनॉनची खरेदी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
औषध क्षेत्रातील दिग्गज कंपनी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रिज यांनी अमेरिकेतील ऑरगॅनॉन अँड कंपनीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाच्या खरेदी करारामुळे सनफार्माचे समभाग 5 टक्के इतके दमदार तेजीत असताना दिसले.
सदरच्या वरील करारांतर्गत 11.75 अब्ज डॉलर्सला ऑरगॅनॉन कंपनीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला. संपूर्ण खरेदी करार हा रोखीने होणार आहे. भारतीय कंपनीचा सर्वाधिक किमतीचा विदेशी अधिग्रहण खरेदीचा हा करार मानला जात आहे. खरेदी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. याअंतर्गत सनफार्मा ऑरगॅनॉनचे सर्व समभाग 14 डॉलर प्रति समभाग या किमतीवर खरेदी करणार आहे. हा व्यवहार रोखीने होणार आहे. ऑरगॅनॉन ही जागतिक स्तरावरची स्वास्थ्य सेवा कंपनी असून 2021 मध्ये मर्कमधून बाहेर पडून स्वतंत्र झाली. ऑरगॅनॉनचा जवळपास 140 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय विस्तारलेला आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर सनफार्मा ही एकत्रित 12.4 अब्ज डॉलर्सच्या महसूलासह जगातील आघाडीवरच्या 25 औषध कंपन्यांमध्ये सामील होऊ शकते. ब्रँडेड जेनरीक औषधांच्या क्षेत्रात यायोगे सनफार्माला अधिक मजबुती प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे.
सर्वात मोठा विदेशी खरेदी व्यवहार
हे जर का अधिग्रहण पूर्ण झाले तर विदेशी व्यवहारातला हा सर्वात मोठा सनफार्माचा व्यवहार ठरणार आहे. यापूर्वी विदेशी व्यवहारांमध्ये पाहता 2007 मध्ये टाटा स्टीलने कोरसचे 12 अब्ज डॉलर्ससह अधिग्रहण केले होते तर 2010 मध्ये भारती एअरटेलने जैन टेलिकॉमचा आफ्रिकेतील व्यवसाय 10.7 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केला होता.
समभाग वधारला
या कराराच्या बातमीनंतर सनफार्माचा समभाग शेअरबाजारात 8 टक्के इतका वाढला होता. याचदरम्यान इंट्रा डे दरम्यान समभागाने 1766 रुपयांची उच्चांकी गाठली होती. नंतर 7 टक्के वाढत 1742 रुपयांवर आला होता. याने कंपनीच्या बाजार मूल्यात 27400 कोटीची भर पडली आहे.