लँड फॉर जॉब प्रकरणात तेजप्रताप यांनाही समन्स
लालूप्रसाद यादव यांच्यासह कुटुंबियांच्या अडचणीत वाढ
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि इतर आरोपींना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने लँड फॉर जॉब आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. याप्रकरणी पहिल्यांदाच न्यायालयाने लालूंचा मोठा मुलगा तेजप्रताप, अखिलेश्वर सिंह आणि त्यांची पत्नी किरण देवी यांनाही समन्स पाठवले आहे. तेजप्रताप यादव यांचा सहभाग असण्याची शक्मयता नाकारता येत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
लँड फॉर जॉब प्रकरणात आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्यासह संपूर्ण परिवाराच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हे प्रकरण नोकरीसाठी जमीन प्रकरणाशी संबंधित आहे. लँड फॉर जॉब प्रकरणी खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचा दावा न्यायालयाने केला आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. लँड फॉर जॉब प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान लालू यादव यांच्या कुटुंबीयांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचेही न्यायालयाने मान्य केले आहे. पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात जमीन हस्तांतरित करण्यात आल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. ही जमीन यादव कुटुंबीयांच्या नावे हस्तांतरित करण्यात आल्याचेही न्यायालयाने मान्य केले.