पन्नू प्रकरणी भारताला समन्स अनुचित
अमेरिकेच्या न्यायालयाविरोधात भारताची तीव्र प्रतिक्रिया, योग्य कारवाई केली जाण्याचे संकेत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेतील शीख दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू प्रकरणात अमेरिकेच्या एका न्यायालयाने भारत सरकार आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना समन्स पाठविले आहे. पन्नू हा शीख फॉर जस्टीस या अतिरेकी विचारसरणीच्या संघटनेचा म्होरक्या आहे. त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप एका भारतीयावर ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात हे समन्स पाठविण्यात आले आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने पाठविलेले हे समन्स अनुचित असून भारताने या प्रकरणात आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. पन्नू हा दहशतवादी असून त्याची कृष्णकृत्ये सर्वपरिचित आहेत. त्याने अमेरिकेत राहून भारताच्या विरोधात कारस्थाने केली आहेत. भारताने अमेरिकेला त्याच्या कृत्यांची माहिती दिलेली आहे. तरीही हे समन्स पाठविण्यात आले. ज्यावेळी पन्नू प्रकरण आमच्या समोर आणण्यात आले, तेव्हा भारताने त्वरित कारवाई करण्यास प्रारंभ केला. या प्रकरणात भारताच्या कोणत्या अधिकाऱ्याचा किंवा उच्चपदस्थाचा हात आहे काय याची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती भारताने यापूर्वीच स्थापन केली आहे. भारत सरकारची या प्रकरणात काहीही भूमिका नाही, हे भारताने आधीच स्पष्ट केले आहे, असे प्रतिपादन विदेश विभागाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी केले.
आरोप पूर्णत: निराधार
गुरुपतवंतसिंग पन्नू हा अमेरिकेचा नागरीक आहे. त्याच्या विरोधात कोणत्या भारतीयाने काही केले असेल तर भारत अशा कृतीचे समर्थन करणार नाही. तसेच भारताच्या दृष्टीला ही बाब आणली गेल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून ती अत्यंत गंभीरपणे सर्व पैलूंची तपासणी करीत आहे. या प्रकरणात भारत सरकारचा कोणताही सहभाग नाही. अशा सहभागाचे आरोप यापूर्वीच आम्ही फेटाळले असून ते निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत या समन्सचे कोणतेही औचित्य रहात नाही, असे विदेश विभागचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले. पन्नू हा भारताच्या आणि त्याच्या नेत्यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे देण्यासाठी प्रसिद्ध आहे, असेही बागची यांनी निदर्शनास आणले.
काय आहे प्रकरण ?
अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेला शीख दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याची हत्या करण्यासाठी भारताचा नागरीक निखील गुप्ता याने सुपारी दिली होती असा आरोप आहे. ही सुपारी घेणारा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचाच अधिकारी होता. निखील गुप्ता याला जाळ्यात अडकविण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने हा सापळा रचला होता. नंतर गुप्ता याला झेकोस्लोव्हाकिया या देशात अटक झाली. त्याला अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर अमेरिकेत अभियोग सादर करण्यात आला आहे. पन्नू याने या अभियोगाच्या आधारावर भारत सरकार, भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भारताच्या ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल, ‘रॉ’चे प्रतिनिधी विक्रम यादव आणि निखील गुप्ता यांच्याविरोधात दिवाणी प्रकरण अमेरिकेच्या दक्षिण न्यूयॉर्कमधील जिल्हा न्यायालयात सादर केले आहे. या न्यायालयाने या सर्वांच्या नावे समन्स प्रसिद्ध केले आहे. भारताने या प्रकरणात आपला किंवा आपल्या कोणत्याही अधिकाऱ्याचा हात नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तसेच पन्नू याने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.