उन्हाळ्याची चाहुल : शहरात ठिकठिकाणी पाणपोईची सुविधा
बेळगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध सामाजिक संस्था, मंडळे तसेच नागरिकांच्या सहकार्याने ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. उन्हात मोठ्या प्रमाणात तहान लागते. यामुळे वारंवार पाण्याची आवश्यकता भासत असते. काहीवेळा गैरसोईलाही सामोरे जावे लागते. याचा विचार करून ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. दैनंदिन कामानिमित्त शहरात येणारे नागरिक, कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले तसेच प्रवाशांना उन्हामुळे पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मुख्य चौक, बसस्थानक परिसर, बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी नागरिकांसाठी ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची सोय होणार असून शहरात येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारच्या वेळेत नागरिकांनी शक्मयतो घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवावी. तसेच आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दरवषीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सेवेसाठी पाणपोई सुरू करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. उन्हाची तीव्रता जसजशी वाढेल तशी आणखी पाणपोईंची संख्या वाढणार आहे.