For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा

04:54 PM Mar 01, 2025 IST | Radhika Patil
आला उन्हाळा आरोग्य सांभाळा
Advertisement

सातारा :

Advertisement

सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे जुन या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच त्यामुळे मृत्युही होणे संभवनीय असते. सध्या सातारा जिल्हयात तापमानामध्ये वाढ आढळून येत आहे. उष्माघाताने मृत्यु होऊ नये यासाठी नागरिकांनी जागरुक राहिले पाहीजे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी पत्रकाद्वारे केलेले आहे.

त्यांनी सुचवलेले उपाय पुढीलप्रमाणे अतिजोखमीचे घटक म्हणजे ६५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती. १ वर्षाखालील व १ ते ५ वयोगटातील मुले, गरोदर माता, मधुमेह हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती, अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. उष्माघात होण्याच्या कारणामध्ये उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थीतीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. त्याची लक्षणे म्हणजे, थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था आदी लक्षणे आहेत. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत, उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे, सरबत प्यावे, अधुनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी, उष्माघाताची लक्षणे होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा, उन्हात बाहेर जातांना चष्मा, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

तसेच पुढे डॉ. खलिपे म्हणाले, उष्माघातावर उपचार म्हणून रुग्णास वातानुकुलीत खोलीत ठेवावे अथवा मोकळ्या हवेशील खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर सुरु ठेवावेत. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुगणाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत. आवश्यक्ते नुसार सलाईन देणे. सातारा जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. आवश्यक तो औषधीसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, असेही डॉ. खलिपे यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.