तेंडोलीत गवारेड्यांचा धुमाकूळ । उन्हाळी शेती संकटात
वार्ताहर/ कुडाळ
तेंडोली परिसरात सध्या गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. या भागात सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेती केली आहे. शेतकरी अथक परिश्रम काबाडकष्ट करून उन्हाळी भात शेती करतात. परंतु वन्य प्राणी मात्र भात शेतीचे नुकसान करीत आहेत. गव्यांच्या कळपाने सध्या शेतकऱ्यांच्या भातशेतीला लक्ष केले आहे. कुडाळ तालुक्यातील तेंडोली- भोमवाडी येथील शेतकरी तुळशीदास तेंडोलकर यांच्या शेतातील गुरांसाठी पेरलेला चारा शनिवारी रात्री गवारेड्यांनी खाऊन नुकसान केले आहे.सात-आठ गवारेड्यांचा कळप दिवसा -ढवळ्या लोकांना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत.तेंडोली परिसरात गेली दोन वर्षे गवारेड्यांचा कळप वावरत आहे. पावसाळ्यातही या गवारेड्यांच्या कळपाने शेतीचे नुकसान केले होते. त्यावेळी या गवारेड्यांची संख्या कमी होती. अलीकडेच या गवारेड्यांचा कळप वाढला आहे. चार दिवसापूर्वीच सात-आठ गवारेड्यांचा कळप शाळेतील मुलांच्या निदर्शनास आला होता. तेंडोली-भोमवाडी येथील तुळशीदास तेंडोलकर यांनी एक दीड एकर क्षेत्रात भुईमुग, कुळीथ, मिरची, जनावरांसाठी बाजरी, कडबा, मका, यांसारखी पिके केली आहेत. मात्र गवारेड्यांच्या कळपाने एका रात्रीत या भात शेतीचे नुकसान केले. जनावरांसाठी केलेला चारा या गवारेड्यांनी खाऊन अक्षरशः नासधुस केली आहे. एकतर आता उन्हाळ्यात पाण्याची मोठी कमतरता आहे. तेथील शेतकरी ओहळाच्या पाण्यावर शेती करतात. त्यातकरून असे रानटी प्राणी अशी नासधूस करू लागले तर आम्ही करायचे तरी काय? असा सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे. काबाडकष्ट करून मेहनतीने तेंडोलकर कुटुंबीय पावसाळी व उन्हाळी शेती करतात. उन्हाळ्यात ते जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा पेरतात. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांनी केलेली शेती पुर्ण वाया गेली आहे. गवारेड्यांनी केलेले नुकसान तेंडोलकर कुटुंबीयांना पाहावत नाही. अशी परिस्थिती निर्माण केली आहे. गवारेडयांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही. तेंडोलकर कुटुंबीयांचे साधारण 15 ते 20 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. वनविभागाने गवारेड्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.