For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या अध्यायाचा सारांश

06:53 AM Sep 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या अध्यायाचा सारांश
Advertisement

वनवास व अज्ञातवास संपवून परत आल्यावर पांडवांनी कौरवांकडे अर्धे राज्य मागितले. कौरव ते देण्यास तयार होईनात. त्यामुळे दोघांची सैन्ये कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्धासाठी समोरासमोर उभी ठाकली. धृतराष्ट्राला युद्धभूमीवर काय काय चाललंय ते कळावे म्हणून व्यासमुनींनी संजयला दिव्य दृष्टी दिली होती. त्यामुळे युद्धभूमीवर जे जे घडत होते ते ते सर्व तो धृतराष्ट्राला सांगत होता. सर्वप्रथम दुर्योधनाने गुरु द्रोणाचार्य ह्यांना दोन्ही सैन्यातील शूरवीरांची ओळख करून दिली. नंतर त्याने आपल्या वीरांना ठरलेल्या व्यूहरचनेनुसार आपापल्या जागी राहून भीष्मांचे रक्षण करण्यास सांगितले. त्याला आनंद वाटावा म्हणून युद्धाला सुरवात करण्यापूर्वी भीष्मांनी त्यांचा शंख मोठ्याने फुंकला. त्याचबरोबर कौरववीरांनी आपले शंख फुंकले आणि रणवाद्येही वाजू लागली.

Advertisement

इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातून आलेल्या माधव आणि अर्जुनाने त्यांचे दिव्य शंख फुंकले. शंख फुंकण्यामध्ये भगवंत आघाडीवर होते. भगवंत अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत होते. पांडव सैन्याच्या शंख वादनाच्या नादातून कौरवांची हृदये विदारली. तो नाद सर्व भूमीवर तर पसरलाच पण तो इतका भयंकर होता की त्याने आकाशही दुमदुमून टाकले. आता युद्धाला सुरवात होणार असे वाटत असतानाच, हातात धनुष्य घेतलेला अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यामध्ये उभा कर म्हणजे युद्धाची इच्छा मनात धरून आलेल्या कुणाकुणाशी मला झुंजावे लागेल ते मला कळेल. त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा केला आणि ते अर्जुनाला म्हणाले, भीष्म, द्रोण आणि इतर राजांना नीट पाहून घे. ही मंडळी अनीतीने कौरवांचा पक्ष घेऊन लढत आहेत. त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहू नकोस. अर्जुन जमलेल्या योद्ध्यांना न्याहाळू लागला आणि त्याच्या लक्षात आले की, दोन्ही सैन्यामध्ये आजे, काके, मामे, सासरे, सोयरे, सखे, गुरु, बंधू, मुले, नातू उभे आहेत. युद्धात हे सर्व मरणार असेही त्याच्या लक्षात आले. अर्जुन स्वत: शूरवीर योद्धा होता. त्याला पराभवाची भीती वाटत नव्हती. असे असले तरी युद्धात विजय मिळवण्यासाठी ह्यातील कित्येकांना त्यांचा जीव गमवावा लागणार आणि त्यासाठी आपण कारणीभूत होणार असे त्याच्या मनात आले. अत्यंत दु:खाने तो भगवंतांना म्हणाला कृष्णा, ह्या स्वजनांच्या मरणाच्या कल्पनेने माझी गात्रे गळून गेली आहेत आणि तोंडही कोरडे पडले आहे. शरीराला कंप सुटल्यामुळे मी धनुष्य हाती धरण्यास असमर्थ झालो आहे. मला ही सगळी लक्षणे विपरीत वाटत आहेत. ह्या स्वजनांना मारून आपले काही कल्याण होईल असे मला वाटत नाही. मला युद्धातला विजय नको, त्यातून मिळणारे राज्यही नको कारण ज्यांच्यासाठी हे युद्ध करायचे तेच जर मृत्युमुखी पडणार असतील तर लढून तरी काय उपयोग? ह्यांना मारून अगदी विश्वाचे राज्य मिळाले तरी मला ते नको. हे कौरव अत्याचारी आहेत हे खरे पण ह्यांना मारून, आम्हालाच पाप लागेल. ह्या पापामुळे तू आम्हाला सोडून निघून जाशील. आपण पाप करतोय हे ह्यांना कळत नाही पण आम्हाला तरी हे समजायला नको का? युद्धात कुलक्षय झाल्यामुळे अधर्म माजेल, वर्ण संकर घडेल, त्यामुळे सर्व कुळाला नरकाची वाट धरावी लागेल. राज्यसुखासाठी स्वजनांना मारण्यापेक्षा गप्प बसलेले बरे मग मला त्यांनी ठार मारले तरी चालेल. अर्जुनाला युद्ध करायचे नसल्याने त्याने अनेक भलतीसलती कारणे पुढे केली आणि धनुष्य टाकून तो रथात बसून राहीला.

अध्याय पहिला सारांश समाप्त

Advertisement

Advertisement
Tags :

.