महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गणेशगीतेच्या पहिल्या अध्यायाचे सार

06:30 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वरेण्यराजाने बाप्पांना विनंती केली की, तुम्ही मला चांगला योग कोणता आणि तो कसा साधायचा हे समजावून सांगा. बाप्पा म्हणाले, राजा पृथ्वीतलावरील किंवा स्वर्गातील चांगल्या गोष्टी प्राप्त होणे हा चांगला योग नव्हे. जीवनामध्ये घडून येणारा चांगला योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे. हा योग साधण्यासाठी जाणते लोक सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतात. त्यासाठी ज्ञानेन्द्राrयांवर विजय मिळवतात. आहारजय साधून ऊर्ध्वरेते होतात. असे योगी त्रैलोक्याला पावन करतात. त्यांचे हृदय दयेने भरलेले असते. कित्येकांना बोध करून ते सन्मार्गाला लावतात. सर्वाभूती एक आत्मा हे तत्व त्यांनी अनुभवलेले असल्याने ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षपणे ते करतात. ह्यालाच कर्मयोग असे म्हणतात. लोकांच्या वागणूकीकडे दुर्लक्ष करून ते लोकोद्धाराचे कार्य चालूच ठेवतात.

Advertisement

मला जो उत्तम योग अभिप्रेत आहे तो त्यांनी तपश्चर्येने साधलेला असतो. त्यांना हे समजले असते की, हे सर्व विश्व माझ्यापासूनच निर्माण झालेले आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय मीच करत असून त्यासाठी आवश्यक ती शक्ती माझ्यात आहे. मी सर्व जगाचा साक्षी असून विकारमुक्त आहे. मी स्वत: आनंदरूप असलो तरी माझी माया सर्वांना मोहात पाडते. त्या मोहामुळे मनुष्य स्वत:चे आत्मस्वरूप विसरून देहाच्या सुखाच्या मागे लागतो. मायेचे अंतरंग जाणून योगी मायापटलाचा भेद करून ब्रह्मपद प्राप्त करून घेतो.

Advertisement

वेदाचे आपल्या सोयीचे अर्थ लावून पंडित लोक इतरांची दिशाभूल करतात. धनप्राप्ती होण्यासाठी लोकांना स्वर्गप्राप्तीचे आमिष दाखवून धार्मिक कर्मे करायला लावतात. जरी पुण्याकृत्ये केल्याने स्वर्गप्राप्ती झाली तरी पुण्याचा साठा संपला की पुन्हा जन्म मिळतो ही गोष्ट ते लोकांना सांगत नाहीत. त्यामुळे भोळे लोक जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतात. हे लक्षात घेऊन लोकांनी वाट्याला आलेले कर्म करून ते मला अर्पण करावे कारण मुळात मीच हे कर्म करायची प्रेरणा त्यांना दिलेली असते. असे केल्याने त्यांची पापपुण्याच्या बंधनातून सुटका होईल. त्यांना परब्रह्माची प्राप्ती होऊन त्यांची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होईल. कर्म करण्याने आणि ते मला अर्पण करण्यानेच चित्तशुद्धी होते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत वाट्याला आलेले कर्म टाळू नये.

सर्वांच्यात माझा अंश असल्याने सर्वांकडे समदृष्टीने पहा. जीवनात येणाऱ्या सुखदु:खात मनाचा समतोल ढळू देऊ नकोस. ह्यालाच समत्वयोग असे म्हणतात. इंद्रिये सुचवत असलेल्या देहसुखाकडे पाठ फिरवून जीवनाला आवश्यक तेव्हढे भोग भोगणे. आपले कर्तव्य निरपेक्षतेने पार पाडण्याच्या दृष्टीने योग्य ते कर्म करणे ह्याला ज्ञानयोग असे म्हणतात. ज्ञानयुक्त कर्म केले की, कर्मयोग साधला जातो. ह्यामुळे कर्म करण्याचे कौशल्य साधले जाते. असा योगी वेदाज्ञेच्या पलीकडे जातो. तो स्वानंदात रमलेला असतो. त्याची बुद्धी स्थिर झालेली असल्याने तो कायम शांतीरूप होऊन वावरत असतो.

ब्रह्मप्राप्ती झाल्याने त्याचे विषयावरील प्रेम संपुष्टात आलेले असते. तो संयमाने इच्छांवर मात करत असल्याने सदैव प्रसन्न असतो. योग्याच्याकडे पाहून लोक त्याच्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांनी तप करून इंद्रियजय साधला नसल्याने त्यांना तसे आचरण करणे जमत नाही. उलट विषय मिळाले नाहीत तर त्याला राग येतो. सदैव कशाची ना कशाची तरी अपेक्षा केल्याने त्यांना स्वस्थता लाभत नाही. अर्थातच सामान्य मनुष्याला योगसाधना, जपतप करणे सहजासहजी शक्य होत नाही, म्हणून हे राजा, जो सर्व सोडून मला शरण येतो त्याला ब्रह्मप्राप्ती करून देऊन मी त्याचा उद्धार करतो.

सारांश समाप्त

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article