श्रीगणेशगीता अध्याय पाचवा सारांश
ह्या अध्यायाचे नाव योगवृत्तीप्रशंसनम असे आहे नावाप्रमाणे ह्या संपूर्ण अध्यायात योगाभ्यास करण्याचे महत्त्व विशद केले आहे. अध्यायाच्या सुरवातीला बाप्पा सांगतात की, वेदांनी नेमून दिलेली कर्मे आणि शास्त्रानुसार धर्माचरण करणारा कर्मयोगी हा कर्मे न करणाऱ्या संन्यासमार्गी योग्यापेक्षा श्रेष्ठ असतो. कर्म करूनच योगसिद्धी प्राप्त होते.
कर्मयोग अंगवळणी पडला की, त्यात विशेष सिद्धी मिळवण्यासाठी शम, दम उपयोगी पडतात. अशाप्रकारे कर्मयोगसिद्धी मिळवण्यासाठी इंद्रियसुखाचा संकल्प करू नये. जो असा संकल्प करेल तो स्वत:च स्वत:चा शत्रू होतो कारण ह्या सुखाच्या संकल्पनेतूनच त्याच्या शत्रू, मित्र, उद्धार, बंधन इत्यादि भावना जागृत होतात. ज्याला ह्या भावनांचा स्पर्शही होत नाही त्याला इंद्रिये जिंकणे सोपे जाऊन तो ज्ञान, विज्ञानयुक्त झाल्याने सर्वश्रेष्ठ योगी ठरतो.
कडक ऊन, थंडी, वर, पाऊस इत्यादि, योगाभ्यासाने प्रतीकूल वातावरणात योगाभ्यास करू नये. जेथे वास करणे अनुचित समजले जाते तेथेही योगाभ्यास करू नये. नेहमी शुद्ध भूमीवर योगाभ्यास करावा. शरीर निरोगी राहण्यासाठी योग्याने खाणे, झोपणे इत्यादि गोष्टी योग्य त्या प्रमाणात कराव्यात. योगाभ्यासासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे. स्वत:च्या मनाने योगाभ्यास केल्यास योग्याच्या शरीरात दोष निर्माण होतात. अष्टांगयोगाचा अभ्यास पूर्ण करणाऱ्याला योगाभ्यासशाली असे म्हणतात.
योगाभ्यास करणाऱ्याने इंद्रियांनी दाखवलेल्या वैषयिक आकर्षणाकडे दुर्लक्ष करावे म्हणजे ती अपोआप त्याला वश होतात. चंचल चित्ताला मारूनमुटकून एका जागी स्थिर करण्याचा खटाटोप न करता त्याला गोड बोलून समजावून सांगावे. तरीही ते त्याच्या स्वभावानुसार इकडेतिकडे भरकटू शकते म्हणून त्याच्यावर लक्ष ठेऊन ते भटकू लागले की, त्याला पुन्हा स्थिर करण्यासाठी ते जिकडे गेले असेल तिकडून त्याला काढून एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. चित्ताला एकाग्र करू शकणाऱ्या योग्याला पराकोटीची निवृत्ती लाभते. त्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त होऊन आपण सर्व विश्व व्यापलेले आहे हे लक्षात येते. ह्या पद्धतीने जो माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातील माझ्यातील अंतर कमी करण्यासाठी मीही अत्यादराने त्याच्याजवळ जातो. माझ्याजवळ येण्यासाठी योग्याने सर्वत्र समदृष्टी बाळगावी. त्यामुळे स्वत:तील व प्रत्येकातील माझे अस्तित्व त्याच्या लक्षात येते. तो जीवनमुक्त होतो आणि ब्रह्मादिकानाही वंदनीय ठरतो.
ह्यावर वरेण्यराजाने मनात आलेली शंका बोलून दाखवली. तो म्हणाला, देवा, मन मोठे चंचल असून दुष्ट असल्याने तुम्ही सांगितलेला योगाभ्यास करणे मला कठीण वाटते. ह्यावर काही उपाय मला सांगा. त्यावर बाप्पा म्हणाले, मनाला काबूत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्याला दृढनिर्धाराने अथक प्रयत्न करण्याची गरज असते.
जो ह्यात यशस्वी होतो तोच जन्ममरणाच्या चक्रातून सुटू शकतो. स्वत:च्या बळावर हे कर्म करू म्हंटले तर ते शक्य नसते. त्यासाठी सद्गुरुप्रसाद व सत्संग उपयोगी पडतात. मनाला वश करून घेणे योगसाधना करण्यासाठी आवश्यक आहे. ह्यावर वरेण्याने विचारले की, योगाभ्यास अपूर्ण राहिला तर कोणते फळ मिळते? त्यावर बाप्पा म्हणाले, योगभ्रष्ट साधक दिव्य देह धारण करून, स्वर्गसुख उपभोगुन पुन्हा श्रेष्ठ अशा योगीकुळात जन्म घेतो. पूर्वसंस्काराने त्याचा उर्वरित योगाभ्यास पुढे चालू होऊन पूर्ण होतो. ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, कर्मनिष्ठ योग्यांपेक्षा माझी भक्ती करणारा योगी श्रेष्ठ ठरतो.
अध्याय पाचवा सारांश समाप्त