श्रीगणेशगीता अध्याय आठवा सारांश
अध्यायाच्या सुरवातीला राजाने बाप्पाना विनंती केली की, आता मला आपले सुंदर व्यापक रूप दाखवा. वरेण्यमहाराज बाप्पांचे अनन्य भक्त असल्याने त्यांच्या तोंडून मला तुमचं व्यापक आणि सुंदर रूप दाखवा अशी मागणी आल्याबरोबर त्यांना बाप्पा त्यांचं सर्वव्यापी विश्वरूप दाखवायला तयार झाले. श्रीगजानन म्हणाले, एकट्या माझ्यामध्ये तू हे चराचर विश्व अवलोकन कर. पूर्वी कोणी न पाहिलेली नानाप्रकारची दिव्य आश्चर्ये अवलोकन कर. माझे विश्वरूप दर्शन आत्तापर्यंत कुणीही पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याचं वर्णन तुला कुणीही सांगू शकणार नाही. अशी अनेक दिव्य म्हणजे अलौकिक आणि केवळ ईश्वरालाच घडवून आणणे शक्य असलेली आश्चर्ये मी तुला दाखवतो. ईश्वराचं विश्वरूप हे सर्वव्यापी असून अविनाशी आहे. त्यामुळे माणसाच्या डोळ्यात ते पहायची कुवत नसते. त्यासाठी दिव्यदृष्टीची, ज्ञानदृष्टीची गरज असते. दिव्य चक्षु प्राप्त झालेला वरेण्य राजा, परमेश्वर गजाननाचे अत्यंत अद्भुत असे श्रेष्ठ रूप पाहू लागला.
असंख्य मुखांनी युक्त, असंख्य पाय व हात असलेले, प्रचंड, सुगंधाने लिप्त, दिव्य अलंकार-वस्त्रs व माला धारण केलेले, असंख्य नेत्र असलेले, कोटि सूर्याप्रमाणे तेज असलेले, आयुधे धारण केलेले असे ते सुंदर रूप होते. त्याच्या शरीरामध्ये त्याने नानाप्रकारची त्रिभुवने पाहिली. राजा बाप्पांना म्हणाला, तुझ्या या देहामध्ये देव, ऋषिगण व पितर मी पहात आहे. पाताळे, समुद्र, द्वीपे, राजे, महर्षि यांची सप्तके पहात आहे. हे विभो, नानाप्रकारच्या पदार्थांनी भरलेले तुझे रूप आहे. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, मनुष्य, नाग राक्षस, ब्रह्मदेव, विष्णु, महेश, इंद्र, नानाप्रकारचे देव व प्राणी तुझ्या शरीरामध्ये मी पहात आहे. अनेक दंष्ट्रांच्या योगाने भीषण, नानाप्रकारच्या विद्यांमध्ये प्रवीण, प्रळयकाळच्या अग्नीप्रमाणे मुख प्रदीप्त असलेले, जटायुक्त, गगनाला स्पर्श करणारे असे तुझे रूप पाहून मी भ्रमिष्टासारखा झालो आहे.
विश्वरूपाची भव्यता वरेण्याला समजली पण त्याचं अतिविस्तीर्ण, अक्राळविक्राळ स्वरूप त्याला सहन झालं नाही. म्हणून त्याने बाप्पांना त्यांचं सौम्य असं सगुण रूप दाखवण्याची विनंती केली. त्यावर विश्वरूप म्हणाले, ऋषीमुनीनाही माझे विलक्षण, चिन्मय, दिव्य आणि अलौकिक असे विश्वरूप पहायची उत्कट इच्छा असते पण ते त्यांना पहायला मिळत नाही. माझा भक्तियोग आचरून जे अतिशय उत्कट भक्ती करतात, परम विरक्त होतात, त्यांना ज्ञानचक्षूंची प्राप्ती होते आणि त्यांचा विश्वरूप दर्शनाचा मार्ग सुलभ होतो. आता भीती व मोह टाक व सौम्यरूपधारी मला पहा.
भक्त स्वत:चं अस्तित्व विसरून फक्त बाप्पांचं अस्तित्व मानत असल्याने तो स्वत:च्या स्वभावाला विसरू शकतो. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचं अस्तित्व त्याला मान्य नसतं अगदी स्वत:चं सुद्धा! त्यामुळे देहाबद्दलचं त्याचं ममत्व पूर्णपणे नष्ट झालेलं असतं. म्हणजे त्याची देहबुद्धी शून्य झालेली असते. देहबुद्धी नष्ट होणे हीच सर्वसंगरहित अवस्था होय. त्याला सर्वांच्याबद्दल आदर, प्रेम वाटत असते पण तो त्यांच्या मोहपाशात अडकलेला नसतो. असा भक्त आयुष्य बाप्पांच्या सेवेत घालवत असतो. त्यांना सर्वोत्कृष्ट समजत असतो. त्यांच्यावर अतिशय प्रेम करत असतो. सर्वत्र त्यांनाच पहात असतो. इतरांनी त्याच्याशी केलेल्या वाईट वागणुकीचा त्याच्यावर यत्किंचितही परिणाम होत नाही. कारण त्याच्या लेखी त्यांचे अस्तित्वच नगण्य असते. त्यामुळे त्याला कुणाबद्दल राग लोभ वाटत नाही. अशा भक्ताला ज्ञानचक्षु प्राप्त होतात आणि तो विश्वरूप पाहू शकतो.
अध्याय आठवा सारांश समाप्त