सारांश 3
अध्याय सहावा
योगाभ्यास कसा करावा, त्याचे महत्त्व काय आहे इत्यादि गोष्टी भगवंतांनी सविस्तर सांगितल्या. त्या ऐकून अर्जुनाला असे वाटले की, योगाभ्यास नक्कीच महत्त्वाचा आहे पण मनाच्या चंचलपणामुळे तो पचनी पडणं जवळजवळ अशक्य आहे. त्याबद्दल भगवंताना तो म्हणाला, देवा, तुम्ही आत्ता जो साम्ययोग सांगितलात तो मन चंचल असल्याने एखाद्याच्या मनात स्थिर होईल असे वाटत नाही.
एखादी गोष्ट करू नये असे वाटत असले तरी बळजबरीने ते ती गोष्ट करायला लावते. वाऱ्यालाही लाजवेल असा त्याचा वेग असतो आणि त्याचा निग्रह करून त्याला आटोक्यात ठेवणे अशक्य वाटते. त्यावर भगवंत म्हणाले, तू म्हणतोयस तसं मनावर ताबा मिळवणं कठीण आहे हे खरं पण अभ्यास आणि वैराग्य ह्यांच्यामुळे त्याचा निग्रह होऊ शकतो.
साधकांनी मनापासून प्रयत्न करायला हवा. ह्यामध्ये आपलं भलं आहे ही खुणगाठ मनाशी पक्की हवी. कितीही काळ लागला तरी मी प्रयत्न करण्याचे सोडणार नाही अशी जिद्द हवी मग मन कसे ताब्यात येत नाही ते पाहू. प्रयत्न करताना आपलं कुठं चुकतंय ह्यावर लक्ष ठेवावे आणि हातून चुका घडल्या तर त्या दुरुस्त करून पुन्हा दुप्पट जोमाने प्रयत्न करावा. साधना करताना आहे त्यात समाधानी असावे म्हणजे मन हळूहळू निर्विचार होईल.
पुढे अर्जुनाने भगवंतांना विचारले की, देवा समजा एखाद्या साधकाने श्रद्धेने योगाभ्यास सुरु केला पण योग्य प्रयत्नाअभावी तो अर्धवट राहिला, तर त्याला न ऐहिक सुख मिळते न योगाभ्यासातून मिळणारे अलौकिक सुख, मग तो फुटलेल्या ढगाप्रमाणे तो नष्ट होतो का? वर भगवंत म्हणाले, जो योगाभ्यास करतो तो ह्या लोकी किंवा परलोकी कधीच नाश पावत नाही. जो जीवनात शुभकार्ये करतो तो कधीच दुर्गतीस जात नाही. योगी तर सगळ्यात शुभ कर्म करत असतो. त्यामुळे काही कारणाने त्याचा मृत्यू ओढवल्यामुळे त्याचा योगाभ्यास अर्धवट राहिला तरी त्याला पुण्यलोकात म्हणजे स्वर्गात स्थान मिळते पण मुळचा त्याचा पिंड हा योगाभ्यास करण्याचा असल्याने त्याला लवकरच त्या स्वर्गसुखांचा वीट येतो आणि तो स्वेच्छेने पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतो. त्याच्या मागील जन्मीच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या असतील काहीचा श्रीमंत आणि कुलीन घराण्यात जन्म होतो.
यथावकाश तेथील सुखे उपभोगुन झाली की तो योगाभ्यासाकडे वळतो. जर मागील जन्मीच्या इच्छा अपूर्ण राहिल्या नसतील तर तो अत्यंत दुर्लभ अशा योगीकुळात जन्म घेतो आणि त्याचा मागच्या जन्मी जेव्हढा योगाभ्यास पूर्ण झाला असेल तेथून पुढील योगाभ्यास सुरु होऊन जलद गतीने पूर्ण होतो. ह्या पद्धतीने योगाभ्यास करणारा साधक तो लवकर पूर्ण कसा होईल ह्या नादात सदैव राहिल्याने अनेक जन्मांच्या प्रयत्नातून त्याचे कैवल्यसाक्षात्कार हे ध्येय गाठून तो मोक्षपदी आरूढ होतो.
जे ज्ञानी तापस, कर्मिष्ठ असतात त्यांचा योगाभ्यास करणारा साधक हा आदर्श असतो. म्हणून त्यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ मानला जातो. सगळ्यात श्रेष्ठ योगी कोण असं जर तू मला विचारशील तर जो माझ्यावरून जीव ओवाळून टाकतो, श्रद्धेने मला भजतो तो योगी मला थोर वाटतो.
अध्याय सहावा सारांश समाप्त